अमर निवडणुका!
   दिनांक :05-May-2019
 
आपल्या देशांत कायम होत राहणारी अन्‌ अविरत घडत राहणारी एकमेव घटना म्हणजे निवडणुका. त्यामुळे देशातल्या वातावरणात एकप्रकारची ऊब असते. गर्मजोशी असते, निवडणुका नसल्या की मग काहीच करमत नाही. सगळेच कसे थंड आणि फुसाट वाटू लागते. स्मशानात कुणाला पोहोचवून आल्यावर कसे आयुष्य क्षणभंगूर आणि जग हे मिथ्या आहे, असे वाटते. कशांतच काही राम नाही, असे वाटते. तसेच निवडणुका नसल्या की वाटत असते. निवडणुका असल्या की, वैराग्य येत नाही. निवडणुका या सतत मनोरंजन करणारी बाब आहे. बरे हे मनोरंजन फुकटचे असते... अस्मादिक असा विचार करत असताना बाजूला गरमा गरम चहाचे फुर्के मारत बसलेला एक गल्ली राजकीय पंडित म्हणाला, ‘‘कहाचे फुकट असते हे मनोरंजन?’’ प्रश्नच पडला की आपण तर मनातल्या मनात विचार करत होतो तर याला कसे कळले? निवडणुकीचा विचारही इतका लाऊड असतो की आपण आपल्या मनांतही तो केला तरीही बाजूल्या बसलेल्या माणसाला तो कळतो. त्याचे मात्र खरे आहे, फुकट आहे
असे आपल्याला वाटते; पण तसे नसते. निवडणुकीचा पैसाही आपल्याच खिशातून जात असतो.
 

 
 
 
आता या काळात लोकांना एकमेकांच्या मनातले कळू लागलेले असते. ‘तो त वरून काही दाखवत असला तरीही तो आहे तमक्याचा...’ असे बेधडक सांगतात लोक. इतकेच काय गल्लीच्या बाहेर न पडलेल्या ज्याला आपण सामान्य म्हणतो त्यालाही दिल्लीतल्या नेत्याच्या मनात काय आहे ते कळत असते... राजकारणात अन्‌ तेही निवडणुकीच्या राजकारणात असे होत असते. राजकारणामुळे आपल्या देशात अनेकांना ही सिद्धी प्राप्त झाली आहे. यावरून मला एक किस्सा आठवला.
...तर तिकडे एक बडा नेता मंत्रिमंडळात समावेश व्हावा म्हणून तडफड करत होता. ही गोष्ट किमान पंचवीसेक वर्षांपूर्वीची आहे. ‘साहेब’ त्यावेळी सीएम होते. अखेर त्या नेत्याची धडपड सार्थकी लागली, (असे त्याला वाटले.) तो मग पेढे घेऊन त्याचा राजकारणातला मार्गदर्शक असलेल्या नेत्याकडे गेला अन्‌ म्हणाला, ‘‘बाबूजी, मी मंत्री होणार... हे घ्या पेढे.’’ बाबूजी म्हणाले, ‘‘हे तुला कुणी सांगितले?’’ तर तो म्हणाला, ‘‘खुद्द साहेबांनीच मला सांगितले, म्हणजे यादीच दाखविली.’’ बाबूजी अनुभवी होते अन्‌ त्यांना साहेब चांगले कळले होते. त्यांनी विचारले, ‘‘साहेबांच्या सफारीच्या कुठल्या खिशातून त्यांनी ही यादी काढली होती?’’ तो म्हणाला, ‘‘डाव्या...’’
 
‘‘मग सध्याच तू पेढे वाटू नकोस. तुझा मंत्रिमंडळांत समावेश होणार नाहीय्‌’’ अन्‌ झालेही तसेच... आता हे साहेब कोण, हे सांगायला लावून अडचण करू नका. तुमचीही राजकीय समज तगडी आहे, तुम्हाला हे साहेब कोण ते कळले असेलच.
राजकारणांत हे असेच होते. तिकिट कन्फर्म आहे, कामाला लाग असे सांगितले जाते अन्‌ एबी फॉर्म मात्र दुसर्‍यालाच दिला जातो... तेव्हा एकदम अचंब्यात पडू नका. आता अचंब्यावरून एक किस्सा आठवला, राजकारणांत अन्‌ तेही निवडणुकीच्या राजकारणांत असले धक्के बसत असतात. मुरलेली नेतेमंडळी मात्र आपल्या कामाशी एकदम एकनिष्ठ असतात. ज्याला सोप्या मराठीत ‘निमग्न’ असतात. आता या शब्दांत ‘ग्न’ असल्याने तो वाईट आहे, असे कृपया समजू नका...
तर किस्सा असा आहे की वेबस्टरची डिक्श्नरी तुम्हाला माहिती आहे. तर हा वेबस्टर ही डिक्श्नरी तयार करण्याच्या कामांत गुंतला होता. त्याच्या घरात एक तळघर करवून घेतले होते त्याने अन्‌ तिथे ‘डिस्टर्ब’ होऊ नये म्हणून तो काम करत होता. त्याची एक मदतनीस होती. ती त्याला या कामात मदत करत होती. तळघरात कुणालाही जायला परवानगी नव्हती. त्याची बायकोच काय
 
ती चहा घेऊन जाऊ शकत होती. तेही चहाच्या वेळीच... वेबने बोलावले तरच.
अर्थात विद्वान असला तरीही वय काही झाले नव्हते अन्‌ एक पुरुष अन्‌ बाई एकत्र तळघरात असताना जे काय संबंध यायला हवेत ते त्यांच्यात आले होते. एकदा वेबची बायको चहा घेऊन तळघरात गेली तर तिला नको त्या अवस्थेत हे दोघे दिसले. ती डोळे विस्फारून म्हणाली, ‘‘वेब आय एम सरप्राईज्ड!’’ तर वेबस्टर अगदी शांतपणे म्हणाला, ‘‘नो डार्लींग, यू आर नॉट सरप्राइज्ड... यू आर अमेज्ड!’’राजकारणीही इतके कार्यनिष्ठ असतात, ते शब्दांचीही चूक होऊ देत नाहीत.
आणखी एक किस्सा आठवला. हे किस्सेच असे असतात की ते सांगण्याची उबळ तुम्ही दाबूच शकत नाही. आता हा किस्सा सांगावाच लागेल, कारण उबळ दाटून आली आहे... पण आपण मूळ विषयापासून भरकटतो आहे असे अजिबात नाही. आपला विषय निवडणुका आहे अन्‌ त्याला धरूनच हे सगळे येत आहे.
 
आपला विदर्भातलाच एक जुना नेता होता. बर्‍याच टर्म आमदार होता. मंत्रीही होता. त्याला निवडणुकीत पाडणे जमले नव्हते. विरोधकांनी त्याच्या सेक्रटरीला फोडले अन्‌ साहेबांना पाडले. कसे? तर साहेब जपानला जाऊन गुपचाप डोळ्यांचे ऑपरेशन करून आले होते. दृष्टीदोष असलेल्या नेत्याला जनता कशी निवडून देणार म्हणून हे दडविले होते; पण नेमकी मध्यावधी निवडणूक आली अन्‌ प्रचाराला उभे रहावेच लागले. डोळ्यांवर काळा गॉगल लावून साहेब प्रचार करत होते. सेक्रटरीनेच हे पसरविले की साहेबांनी जपानहून हा चष्मा आणला आहे आणि हा एक्सरे ग्लासचा चष्मा आहे. त्यातून समोरचे लोक निर्वस्त्र दिसतात... बायका साहेबांचे भाषण ऐकायला येईनाशा झाल्या अन्‌ साहेब पडले!
तर निवडणुकीमुळे हे असे किस्से जन्माला येतात, ते खरे किती अन्‌ खोटे किती हे सांगता येत नाही, मात्र सांगितले जातात सगळीकडेच. निवडणुकीची ऊब असतेच त्यामुळे. मुळात राजकारण कुटुंबासूनच सुरू होते अन्‌ मग ते देशभर पसरत असते. ते कुठलेही असले तरीही मनोरंजन करते कारण ते आपलेच वाटते. अगदी अमेरिकेतही ट्रम्प आणि क्लिटंन बाईंचेही राजकारण आपल्याला इकडे मजा आणत असते.
 
लोकशाहीत कुठल्याही क्षेत्रात सत्ता हवी असेल, महत्त्वाचे पद हवे असेल तर निवडणूक आलीच. कुणी कुणाची नेमणूक करू शकत नाही. अगदी शाळेत आठवा ‘ड’चा वर्गप्रमुख व्हायचे असेल तरीही निवडणुकीला सामोरे जावेच लागते. साधी आपल्याला धावणी शितडणी खेळाची असेल तर ओली-सुकी नाहीतर अकना पकनी करावी लागते. डाव कुणावर आणायचा हे ठरविण्यासाठीही असे काही करावेच लागते. एकप्रकारची ही निवडणूकच आहे ना राजेहो! त्यामुळे त्या कुठेना कुठे, अशा नाही तर तशा होतच असतात. म्हणजे बघाना, आता लगेच विधानसभेच्या निवडणुका आहेत. मधल्या काळांत काही जिल्ह्यांत ग्राम पंचायतीच्या निवडणुका झाल्या. काही ठिकाणी आता पोटनिवडणुका आहेतच. सध्या काही राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत अन्‌ येत्या काळात आणखी असतील. मग पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगर पालिका, महानगर पालिका, परिषदा, विद्यापीठाची विद्वत्‌परिषद, विविध सहकारी संस्था, बाकी संस्था, कारखाने, बँका... कशाच्या ना कशाच्या निवडणुका सुरूच असतात सतत. काहीच नाही तर महाविद्यालयाच्या असतात. आपल्या देशांत नसतातच असे नाही; पण एखादवेळी अशी निवडणुका नाहीच, अशी असाधारण स्थिती आली तर अमेरिकेत तरी त्या असतातच. क्रिकेट आणि निवडणुका या सतत कुठेना कुठे सुरूच राहणार्‍या बाबी आहेत.