कोल्हापुरचा वनमल्ल : सुहास वायंगणकर
   दिनांक :05-May-2019
यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक, दिशा फाउंडेशन, अमरावती.
9730900500
 
माणसासाठी धावणारे इथे हजारो आहेत; पण मुक्या प्राण्यांसाठी धडपडणारे आजही बोटावर मोजण्या इतकेच..! वनस्पती, वन्यप्राणी, पक्षी, फुलपाखरे व कीटकांचे संवर्धन झाले तरच मानवाचे संवर्धन शक्य आहे. हे मानवाच्या अस्तित्वाचं अन आयुष्याच गमक या रानवेड्यांना कळलं, म्हणूनच ते बेभान होऊन या निसर्ग सेवेत तल्लीन होऊन काम करताना दिसतात. म्हणजेच जंगलातल्या या न तुडववेल्या वाटेवरचे हे प्रवासी आपली तहान- भूक विसरून या निस्वार्थ सेवेत मग्न होतात. अशा न तुडवलेल्या वाटांना ना किलोमीटरचे दगड असतात ना त्या वाटेवर गाव लागते. ना अलिशान मुक्कामाची सोय ना पंचपक्वानाचा बेत मिळतो. मात्र हे रानवेडे अवलिया निमुटपणे आपली निसर्गसेवा करण्यात मग्न असतात.
 
पक्ष्यांच्या मंजुळ आवाजात आपला सूर मिसळवत तर कधी फुलपाखराप्रमाणे जंगलाभोवती रुंजी घालत तल्लीन होऊन निसर्गाची सेवा करतात. प्रसिद्धीच्या दूर राहून व कोणत्याही सोशल मेडियावर फोटोंचा बाजार मांडून ते आपल्या कामाचे प्रदर्शन करीत नाहीत. सोशल मीडियावर माहिती व फोटो टाकून केवळ प्रसिद्धीसाठी काम करणारे, सोशल मिडियाचा जनजागृतीसाठी उपयोग घेणारे आणि कसलीही प्रसिद्धी न करता सतत काम करणारे असे तीन वर्ग आपल्या व्यवस्थेत आहेत. सुहास तिसर्‍या व्यवस्थेतला आहे. गोठलेली नदी जशी बर्फाखालून वाहते तसा सुहास वाहतो. विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक आणि सामान्य माणूस यांच्या मनात घर करून निसर्ग सेवेच बीजारोपण करण्यात हा वस्ताद आहे.
  
 
दि. २० ते २४ मे २००९ दरम्यान बी.एन.एच.एस. व ताडोबा व्याघ्र प्रकल्पाद्वारे आयोजित राज्यस्तरीय ताडोबा महोत्सवात माझी आणि सुहास वायंगणकर ची पहिली भेट झाली. बी.एन.एच.एस.चे सहायक संचालक संजय करकरे यांनी महाराष्ट्रातून बोलावलेल्या विषयतज्ज्ञांमध्ये आमचा सहभाग होता. सुहास, धर्मराज, राहुल, कृतार्थ आणि संजय सर आमची जबरदस्त टीम होती. महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यातील राष्ट्रीय हरित सेनेच्या मास्टर ट्रेनर व विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षणाचे धडे देताना सुहासला पहिल्यांदा पाहून मी पुरता भारावून गेलो. बोलण्याचा अस्सल कोल्हापुरी बाज आणि प्रचंड माहितीचा भांडार अशी ती सुहासची छाप माझ्या मनावर आजतागायत कायम आहे. सुहास न कंटाळता सतत व सर्वंकष माहिती देत होता. निसर्ग संवर्धन तसेच संरक्षणासाठी तुम्ही खास पुढाकार घेतला पाहिजे. तुमच्या पेशाचा उपयोग हा निसर्गाचा अमुल्य साठा वाचविण्यासाठी झाला पाहिजे. असं तो नेहमी विद्यार्थी व शिक्षकांना ठासून सांगतो.
 
शिवाजी विद्यापिठातून एम. कॉम. पूर्ण केलंय. पर्यावरण शिक्षणात पदविका उत्तीर्ण केल्यानंतर विश्व प्रकृती निधीच्या कोल्हापूर विभागामध्ये सहाय्यक शिक्षण अधिकारी म्हणून १० वर्षे काम केले आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल नंतर भारतात सर्वाधिक निसर्ग मंडळे कोल्हापूर विभागात त्यांनी निर्माण करण्यात आपली ताकद पणाला लावली. सुहास यांना आजवर सहा पुरस्काराने सन्मानित करण्यात आल आहे. तो दोन पुस्तकांचा सहलेखक असून आजवर त्याचे ५० हून अधिक लेख विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहेत. अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थाबरोबर कामसुद्धा केलं आहे.
 
पश्चिम घाट व गोवा भागात निसर्ग शिक्षणाची फळी उभारण्यात सुहासचा मोठा वाटा आहे. वन्यजीव व पर्यावरण या विषयावर सादरीकरण, क्षेत्र भेटी, प्रशिक्षण कार्यशाळा, जंगलफेरी, पक्षीनिरीक्षण आदीबाबत विविध शाळा व महाविद्यालयात फुलपाखरू उद्यान निर्मिती, पाणी संवर्धनासाठी शोषखड्डा, बनविणे, स्थानिक झाडांच्या बिया गोळा करून बीज बँक व त्या माध्यमातून रोपवाटिका बनविणे, जैवविविधता रजिस्टर इ. सुहास यांनी पर्यावरण शिक्षणाची मोठी फळी उभी केली आहे. वनसंपदा म्हणजेच वनस्पती, वन सस्तन प्राणी, पक्षी, फुलपाखरे आणि त्यांचा सहसंबंध, त्यांच्या पायांचे ठसे ई. विषय सुहास अपल्या सुहास्य शैलीत सहज उलगडून सांगतो. त्यांच्या गोड शैलीत लहानथोर असे सगळेच तल्लीन होऊन ऐकतात.
 
सन २००९ हे वर्ष सुहासच्या आयुष्यातले खर्‍या अर्थाने सुवर्ण वर्ष आहे. वैश्विक तापमान वाढ व वातावरण बदल हा खरा निसर्गाला धोका आहे. यावर सर्वांनी एकत्र होऊन काम केलं पाहिजे म्हणून जनजागृती आवश्यक आहे. लोकसहभाग मिळाला तरच निसर्ग संवर्धन शक्य आहे. याचा भावनेतून सुहासने कोल्हापूर ते तिरुपती हे ७५० कि.मी. अंतर पायी चालत विविध शाळांमध्ये जनजागृती केली. न तुडववेल्या वाटेवरचा हा निसर्गवेडा तुडवलेल्या वाटेवर ७५० कि.मी. चालून जनजागृती साठी धडपड करतो यातून त्याच्या निसर्गप्रेमाची आपण कल्पना करू शकतो. आजवर एकूण ३० फुलपाखरू उद्यान निर्मिती व औद्योगिक वसाहती मध्ये वृक्षारोपण करण्यात सुहास यांनी पुढाकार घेतला आहे.
 
पश्चिम घाटातील दुर्मिळ व संकटग्रस्त तसेच प्रदेशनिष्ठ वनस्पती लावण्यासाठी पुढाकार, पर्यावरण शिक्षण व संवर्धन, लोकसहभाग आणि संरक्षण या भूमिकेतून स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांचे पारंपारिक ज्ञान वापरून पर्यावरणाचे काम अधिक सकारात्मक पद्धतीने करता येते या सुहासच्या ब्रह्मवाक्यात त्याच्या निसर्गप्रेमाच बीज दडलंय अस मला वाटते. स्थानिक झाडांच्या रोपनाला प्राधान्य, पाणी, माती, झाडांचे सोप्या पद्धतीने जतन करणे अशा वेगवेगळ्या अंगाने सुहासची भूमिका महत्त्वाची आहे. जिथे कुस्तीचे धडे गिरविले जातात व ज्या कोल्हापूर जिल्ह्याने आपल्या देशाला हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी सारखे मल्ल दिलेत. त्याच ठिकाणी सुहास निसर्गसेवेचे धडे देऊन निसर्गासाठी कार्य करणारे मल्ल तयार करतोय, हे मला अधिक कौतुकास्पद वाटतं.