दुष्काळग्रस्तांसाठी सरकार तिजोरी रिकामी करेल- महादेव जानकर
   दिनांक :05-May-2019
मंत्री महादेव जानकर यांची ग्वाही
 
 पंढरपूर: आतापर्यंत सुमारे आठ लाख जनावरे सरकारी छावण्यांमध्ये दाखल झाली असून, त्यांची योग्य निगा राखली जात आहे. तसेच, वेळ पडल्यास सरकार दुष्काळ भागातील शेतकर्‍यांसाठी तिजोरी रिकामी करेल, अशी ग्वाही पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिली. मंत्री जानकर यांनी सांगोला तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. यावेळी ते बोलत होते.
 

 
 
दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना राज्य सरकार पैसा कमी पडू देणार नाही. जनावरांना देण्यात येणार्‍या चार्‍यामध्ये तीन किलोंनी वाढ केली असून, जनावरांच्या संख्येबाबत आणि इतर जाचक अटी देखील शिथिल केल्या जातील. गेल्यावेळी छावण्यात झालेले गैरप्रकार टाळण्यासाठी संपूर्ण डिजिटलायझेशन करण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
राज्यात एकू ण 1 कोटी 12 लाख पशुधन असून, सरकारने सुरू केलेल्या 1 हजार 248 छावण्यांमध्ये आठ लाख जनावरे दाखल झाले आहेत. पशुपालकांच्या मागणीनुसार प्रत्येक जनावरासाठी आता 15 ऐवजी 18 किलो चार्‍याची सोय केली
आहे.
जनावरांना बॅच मारण्यासाठी शेतकर्‍यांकडून घेतलेले सहा रुपये देखील परत करण्यात येणार आहेत. याशिवाय सरकारकडून जनावरांचा विमा काढणार असल्याचे मंत्री जानकर यांनी सांगितले. दुष्काळी भाग पाहणी दौर्‍याच्या निमित्ताने जानकर यांनी सांगोला तालुक्यातील विविध चारा छावण्यांमध्ये शेतकर्‍यांशी विविध प्रश्नांवर चर्चा केली.