कुपनलिकेतून पाण्याचा अखंड प्रवाह ; मेळघाटात निसर्गाचा चमत्कार
   दिनांक :05-May-2019
अमरावती: निसर्ग चमत्कारी आहे आणि त्याच्या चमत्काराचे दर्शन केव्हा, कधी आणि कुठे होईल हे सांगता येत नसले तरी भर उन्हाळ्यात नदी व जंगल जलमय करणारा चमत्कार अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील करी गावानजीक मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत घडला आहे.
 

 
 
 
वनविभागाने तयार केलेल्या कुपनलिकेतून (बोअरवेल) दर दिवसाला १६ लाख लिटर पाणी गेल्या सात दिवसापासून अखंड बाहेर येत आहे. कोणत्याही इलेक्ट्रीक पंपाचा उपयोग न करता हे पाणी नैसर्गिक पद्धतीने बाहेर येत आहे. करी गाव मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत नवनिर्मित वन्यजीव विभागात येतेे. या क्षेत्रातील वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्यासाठी वनविभागातर्फे पाणवठा व कूपनलिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जागेची स्थळ निश्चिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अमरावती येथे कार्यरत भूवैज्ञानिक श्रीपाद टोहरे यांनी केली. टोहरे यांनी जे स्थळ निश्चित केले ते सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी आहे. पाण्याचा मुबलक अंदाज आल्यामुळेच त्यांनी या जागेची शिफारस केली होती. त्यानुसार सात दिवसापूर्वी बोरअवेलचे काम हाती घेण्यात आले. शंभर फुटावर पाणी लागले. नियमानुसार २५० फूट बोअरवेल करण्यात आली. तेव्हापासून सुरू झालेला पाण्याचा प्रवाह आजही अखंड सुरू आहे. या चमत्काराची माहिती मिळताच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अमरावती विभागाचे उपसंचालक डॉ. प्रवीण कथने, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ सुनील कडू, वैज्ञानिक श्रीपाद टोहरे आणि वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी शनिवारी भेट दिली. भूवैज्ञानिकांनी त्याची तपासणी केली. बोअरवेल मधून इलेक्ट्रिक मोटरचा वापर न करता पाणी आपोआप जमिनीवर येत असल्याचे त्यांना दिसून आले. आर्टिशन प्रकारच्या या बोअरवेलची क्षमता ९० कोणाच्या व्ही नॉच वर तपासली असता ती ७ इंच म्हणजेच जवळपास ६४७५० लिटर्स प्रति तास इतकी असल्याचे आढळले. या बोअरवेल मधील पाण्याचे नमुने संकलित केले असून रासायनिक तपासणी अमरावती येथील विभागीय प्रयोगशाळेत करण्यात येणार असल्याने उपसंचालक डॉ. कथने यांनी सांगितले. निसर्गाचा चमत्कार असलेल्या ह्या बोअरवेल मधून दर दिवसाला १५ लाख ४५ हजार लिटर इतकं पाणी बाहेर येत आहे. या पाण्यातून दर दिवसाला अंदाजे ३८ हजार लोकांची तहान भागू शकते. गेल्या सात दिवसापासून या बोअरवेल मधून सतत व निरंतर पाण्याचा प्रवाह बाहेर येतो आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थिती असताना पाण्यासाठी माणसं वणवण भटकत आहे तर दुसरीकडे वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी व त्यांची मनुष्यवस्ती कडे भटकंती होणार नाही याची निसर्गाने केलेली व्यवस्था हा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय आहे. पाणी या विषयावर काम करणारे आणि ओलावा फाउंडेशनचे अध्यक्ष अरविंद कडबे यांच्यासह अनेकांनी या स्थळाला भेटी दिल्या.
पाण्याचे नियोजन व्हावे
वन्यजीव विभागाने तातडीने या पाण्याचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून परिसरातील वन्यप्राणी आणि माणसांची अशी दोघांचीही यातून तहान भागेल. 'पाणी हेच जीवन' या उक्तीप्रमाणे जलसंवर्धन अपेक्षित आहे...!
यादव तरटे पाटील,
वन्यजीव अभ्यासक