पाकिस्तानात पेट्रोल 108 रुपये लिटर!
   दिनांक :05-May-2019
-दुधाचा दर 180च्या घरात
 
इस्लामाबाद, 
 
आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या पाकिस्तानमधील नागरिकांच्या समस्या आता अधिकच बिकट झाल्या आहेत. भाजीपाला, दूध यांच्या किमती वाढल्यामुळे पाकिस्तानी जनता त्रस्त असताना, आता या देशात पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. येथे सध्या एक लिटर पेट्रोलसाठी 108 रुपये मोजावे लागत आहेत.
 

 
 
पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीची नुकतीच बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार, पेट्रोलच्या किमतीत 9 रुपये प्रती लिटर वाढ करण्यात आली आहे. यामुळे या देशातील नागरिकांना आता एक लिटर पेट्रोलसाठी 108 रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलच्या किंमतीत 4.89 रुपये प्रती लिटर व हलक्या डिझेलमध्ये 6.40 रुपये प्रती लिटर वाढ झाली आहे. केरोसिनच्या किमतीत 7.46 रुपये प्रती लिटरपर्यंत वाढीला मंजुरी देण्यात आली आहे.
 
ऑईल अॅण्ड गॅस नियामक प्राधिकरणाने पेट्रोलच्या किमतीत 14 रुपये प्रती लिटरपर्यंत वाढीची मागणी केली होती. त्यानंतर पंतप्रधान इम्रान  खान यांनी हे प्रकरण आर्थिक समन्वय समितीकडे पाठवले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि पाकिस्तानच्या मुद्रेतील अवमूल्यनामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कराची डेयरी फार्मर्स असोसिएशनने काही दिवसांपूर्वी दुधाच्या दरात वाढ केली. ही वाढ 23 रुपये प्रतिलिटर इतकी आहे. त्यामुळे आता दुधाचा भाव लिटरमागे 120 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. किरकोळ बाजारात दूध 100 ते 180 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे.
 
पाकिस्तानमध्ये महागाईने गेल्या पाच वर्षांचा विक्रम मोडला आहे. गेल्या मार्च महिन्यात पाकिस्तानमध्ये महागाईचा दर 9.4 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. महागाईत वाढ, चलनातीची घसरण आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात 10.75 टक्क्यांची वाढ केली.