व्यंगचित्रकार जुलमी राजवट उलथवून लावू शकतो : राज ठाकरे

    दिनांक :05-May-2019
मुंबई: जागतिक स्तरावर आज व्यंगचित्रकार दिन साजरा केला जात आहे. व्यंगचित्रातून विरोधकांचा समाचार घेणारे राजकीय व्यक्तिमत्व असलेले राज ठाकरे यांनी आपल्या खास ठाकरे शैलीत व्यंगचित्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्यंगचित्रकारात एखादी जुलमी राजवट उलथवून लावण्याची क्षमता असते, असा खोचक टोला राज यांनी लागवला.
व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की, एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते. आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे. या निमित्ताने देशभरातील माझ्या व्यंगचित्रकार सहकार्‍यांना शुभेच्छा आहेतच; पण तुमच्या प्रतिभेची देशाला आज सगळ्यात जास्त गरज आहे हे मात्र विसरू नका, असे त्यांनी ट्विटरवरून शुभेच्छा देताना म्हटले आहे.
राज ठाकरेंचे व्यक्तिमत्व जरी राजकीय असले, तरी त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून अनेकांवर राजकीय आसूड ओढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचा राज ठाकरेंनी अनेकवेळा व्यंगचित्राच्या माध्यमातून समाचार घेतला आहे.
 
 
 
त्यांची व्यंगचित्रे ही अनेक अर्थाने खोचक असतात, तसेच त्यातील राजकीय अर्थही अनेक निघतात. त्यामुळे ही व्यंगचित्रे सोशल मीडियावरही व्हायरल होतात. ज्याप्रमाणे राज ठाकरे यांचे भाषण टोकदार असतात. त्याचप्रमाणे, त्यांची व्यंगचित्रेसुद्धा विरोधकांच्या जिव्हारी लागणारी असतात.