पायर्‍यांचा खर्च वसूल करा; कर्मचारी संघटनेची मागणी
   दिनांक :05-May-2019
मुंबई: आठ वर्षांपूर्वी सुमारे दोन कोटी रुपये खर्चून कथित सौंदर्यीकरणासाठी मंत्रालयासमोर बांधण्यात आलेल्या पायर्‍यांच्या बांधकामाचा तसेच त्या तोडण्याच्या कामाचा खर्च संबंधित अधिकार्‍यांकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणिस अविनाश दौंड यांनी आज रविवारी केली.
2012 साली मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतर मंत्रालयात नूतनीकरण करण्यात आले. त्यावेळी दोन कोटी रुपये खर्चून या पायर्‍या बांधण्यात आल्या होत्या. आता त्या अनावश्यक वाटल्याने पुन्हा लाखो रुपये खर्चून शनिवारी पाडण्यात आल्या. जनतेच्या पैशातून हा खर्च करण्यात आला होता. त्यामुळे हा अनावश्यक खर्च करण्यासाठी कोण जबाबदार, याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी, असे दौंड म्हणाले.
 

 
 
 
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या राजवटीत छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मंत्रालयाचे नूतनीकरण झाले. त्यावेळी मंत्रालयाच्या दर्शनी भागाच्या मोकळ्या जागेत असलेल्या काही जुन्या अशोकाच्या झाडांची कत्तल करून तेथे या पायर्‍या बांधण्यात आल्या होत्या. सेंट्रल लायब्ररीच्या धर्तीवर या पायर्‍या बांधण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. आगीनंतर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सहाव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर आणावे आणि या पायर्‍यांवरून अभ्यागतांना थेट त्यांच्या कार्यालयात जाता यावे, अशी कल्पना त्यामागे असल्याचे सांगितले जाते. मात्र, सुरक्षेच्या कारणांवरून मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सहाव्या मजल्यावरच ठेवण्यात आले. आता आग लागल्यास किंवा अन्य कोणत्याही आपत्‌कालीन परिस्थितीत या पायर्‍या अडसर ठरतील. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने त्या काढून टाकण्याचा सल्ला दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या पाडण्याचा निर्णय घेतला. शनिवारी साधारण 50 लाख रुपये खर्चून हे पाडकाम सुरू झाले. रविवारीही हे काम सुरू होते.