'या' फलंदाजाच्या बॅटीतून आफ्रिदीनं झळकावले होते जलद शतकं

    दिनांक :05-May-2019
मुंबई,
 
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी आपल्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रात बरेच गौप्यस्फोट केले आहेत. त्याचे वय, गौतम गंभीरबाबत असलेले मत आदी गोष्टींवर सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्याच्या याच आत्मचरित्रातून एक गोष्ट समोर आली आहे. पदार्पणात त्याने ज्या बॅटीने 37 चेंडूंत विक्रमी शतकी खेळी ती त्याची नव्हतीच. श्रीलंकेविरुद्ध आफ्रिदीनं 37 चेंडूंत आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम केला होता.
 

 
केनिया येथे झालेल्या तिरंगी मालिकेतून आफ्रिदीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचा हा पदार्पणाचा सामना संस्मरणीय ठरला होता. त्याने 37 चेंडूंत सर्वात जलद शतक ठोकले, त्याच्या 40 चेंडूंतील 102 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता. 2014 पर्यंत वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम हा आफ्रिदीच्याच नावावर होता. 2014मध्ये न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनने वेस्ट इंडिजविरुद्ध 36 चेंडूंत शतक झळकावले. पण, आफ्रिदीनं झळकावलेलं ते जलद शतकं हे महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या बॅटीतून साकारले होते.
 
 

आफ्रिदीनं त्याच्या आत्मचरित्रात याबाबतचा खुलासा केला. सचिन तेंडुलकरने प्रतिकृती तयार करण्यासाठी त्याची बॅट पाकिस्तानचा माजी खेळाडू वकार युनिसकडे दिली होती. वकार ती बॅट सिआलकोट येथील क्रीडा साहित्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला देणार होता. मात्र, ती बॅट सिआलकोट येथे पोहोचण्यापूर्वी आफ्रिदीच्या हातात पोहोचली आणि त्याच बॅटीने आफ्रिदीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केले. त्याने लिहिले की,''तेंडुलकरची ती बॅट सिआलकोट येथे नेण्यापूर्वी वकारने ती माझ्या हातात दिली. त्यामुळे मी झळकावलेले पहिले शतक हे तेंडुलकरच्या बॅटीतून आले होते.''