खामोश!
   दिनांक :05-May-2019
भाजपाविरोधी महागठबंधनचा मोठा गाजावाजा झाला खरा. पण ते अस्तित्वात आहे कुठे, हा प्रश्नच आहे. उत्तर प्रदेशात सपा-बसपाने युती करून कॉंग्रेसला दूर ठेवले. पश्चिम बंगालमध्ये ममतादीदीचे कोणाशी पटण्याचा मुद्दाच येत नाही. बिहारमध्ये लालूप्रसादांच्या राजदने कॉंग्रेसला कसेबसे सामावून घेतले असले तरी तेथे घटकपक्षांमध्ये इतके खटके आहेत की, शेवटी काय होईल, सांगता येत नाही.
बिहारचे गठबंधन पाच पक्षांचे आहे. लालूंचा राजद, कॉंग्रेस, राष्ट्रीय लोकविकास पार्टी, हिन्दुस्थानी अवाम मोर्चा (हम) आणि विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) यांचे हे गठबंधन आहे. पण अनेक ठिकाणी ते एकमेकाविरुद्धही मैदानात आहेत. त्यामुळे हे गठबंधन की लठबंधन, असा प्रश्न पडतो!
 

 
 
यासाठी घटकपक्षांनी एकतर बंडखोरीचा आसरा घेतला आहे किंवा अपक्ष उमेदवाराला अप्रत्यक्ष पािंठबा दिला आहे. गेल्या लोकसभेत शरद यादव यांना मधेपुरात पराभूत करणारे पप्पू यादव यांच्या पत्नी रंजित रंजन सुपौलच्या कॉंग्रेस उमेदवार असताना राजदने दिनेश यादव हा अपक्ष उभा केला. याचे उट्टे कॉंग्रेसने मधुबनीत फेडले! ही जागा व्हीआयपीच्या वाट्याला गेली असताना कॉंग्रेसच्या शकील अहमदने बंडखोरी केली. आणखी काही मतदारसंघांमध्येही अशा कुरबुरी असल्याने महागठबंधनचे कसे होईल, असा प्रश्न बिहारवासीयांना पडला आहे.
सर्वात आश्चर्यकारक प्रकार शत्रुघ्न सिन्हाच्या पाटणासाहिब मतदारसंघात घडला आहे. ही जागा कॉंग्रेसला दिली असताना व्हीआयपीने आपली उमेदवार तेथे घुसवली. याचे मजेदार कारण या पक्षाने दिले आहे. नवीन पक्षाने किमान दहा टक्के जागा लढविल्या पाहिजे, असा निवडणूक आयोगाचा दंडक आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी आम्हाला चौथा उमेदवार उभा करावा लागला, असा खुलासा या पक्षाने केला. त्यांच्या वाट्याला तीनच जागा आल्या त्याचवेळी चौथी जागा मागून घेता आली असती ना. ते न करता आता नेमक्या शॉटगनच्याच मतदारसंघात हा घोळ! अन्‌ उमेदवारही कोण? व्हीआयपीचे प्रमुख मुकेश सहानी यांचे लहान बंधू आणि पक्षाचे सरचिटणीस छोटे सहानी यांची पत्नी रितादेवी. म्हणजे सारा घरचाच मामला! पण तो मुळावर उठणार आहे, भाजपातून कॉंग्रेसमध्ये आलेल्या शत्रुघ्नवर!
शत्रुघ्नने हे ओढवून घेतले. त्याला मंत्री व्हायचे होते. (अटलजींंच्या सरकारमध्ये तो मंत्री होता.) पण मोदींनी त्याला टाळले. यामुळे शॉटगन संतापला आणि गेली चार वर्षे मोदींविरुद्ध डॉयलॉगबाजी करीत देशभर फिरला. त्याचा ताल पाहून भाजपाने यावेळी तिकीटच नाकारले! दोनदा राज्यसभा आणि दोनदा लोकसभा असे चारदा खासदार आणि एकदा मंत्री बनविणार्‍या पक्षाशी बेईमानी भोवली. शेवटी आयुष्यभर शिव्या दिलेल्या कॉंग्रेसमध्ये जावे लागले. आता त्याची लढत केन्द्रीय मंत्री रविशंकर प्रसाद सोबत आहे. या दोघांपैकी कोणाला पाटण्याची जनता खामोश करते याकडे संपूर्ण बिहारचे आणि देशाचेही लक्ष लागले आहे.