मोदींची पाच वर्षे भयावह आणि विध्वंसक- मनमोहनसिंग बोलले
   दिनांक :05-May-2019
 
मोदींनी गेल्या पाच वर्षांत देशावर जे राज्य केेले, ते अतिशय भयावह आणि विध्वंसक स्वरूपाचेच होते, असे शब्द माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनिंसग यांच्या तोंडून बाहेर पडले.
संपुआच्या काळात त्यांच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. कारण, सोनियांनी त्यांना काहीही न बोलण्याची तंबी दिली होती. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. सिंग यांच्यावर टीका करताना, कॉंग्रेसने दहा वर्षात मौन धारण करणारा पंतप्रधान दिला, असा आरोप केला होता. त्यावर अखेर डॉ. सिंग यांनी आपले मौन तोडले. ते सुद्धा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून.
 
 
 
मोदींचा हा काळ विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि वैधानिक संस्थांसाठी अतिशय भयावह ठरला. देशात दहशतवादी कारवाया वाढल्या, पुलवामा घटनेत पूर्णपणे सरकारचे दुर्लक्ष झाले. पाच वर्षात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला. राज्याच्या तिजोरीत कोणतीही वाढ झाली नाही. उत्पादन वाढले नाही. मोदींच्या काळात देशात कोणताच विकास झाला नाही. केवळ पुन्हा सत्ता मिळण्यासाठीच ते दररोज नवनवीन गोष्टी सांगत असतात. जनता मोदींच्या कारभाराला कंटाळली आहे. त्यांना बदल हवा आहे. मोदींना आता बाहेरचा रस्ता दाखविण्याची वेळ आली आहे, असे डॉ. मनमोहनिंसग म्हणाले.
त्यांना आता स्क्रिप्टही लिहून दिली जाते काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, डॉ. मनमोहनिंसग यांच्यासारख्या व्यक्तिकडून अशा विधानांची अपेक्षा नव्हती, असे बोलले जात आहे.
 
2014 साली याच मनमोहनसिंग सरकारने दहा वर्षांत केलेले घोटाळे भाजपाने जोरदारपणे जनतेसमोर मांडले होते आणि त्यामुळे जनतेने भाजपाला एकहाती सत्ता दिली होती. आता तेच डॉ. सिंग म्हणत आहेत की, गेल्या पाच वर्षांत सर्वत्र प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यावर अजूनही होणार्‍या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत मात्र त्यांनी मौन पाळले. डॉ. सिंग म्हणाले, आमच्या काळात दहशतवादी हल्ले होत नव्हते. आता काश्मीरमध्ये हल्ले वाढले आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रबंदीच्या घटना वाढत आहेत. विदेश नीतीत आम्ही कमी पडलो. आपल्या देशाचे हित समोर ठेवून काम करावे लागते. मोदींनी केवळ आपली प्रतिमा जपण्यासाठी विदेश नीती वापरली. कूटनीती वापरण्यातही मोदींनी आपल्या देशाचा विचार केला नाही, वगैरे मुक्ताफळे त्यांनी उधळली. नुकतेच एक विधान डॉ. सिंग यांनी केले होते. आमच्या काळात तीन सर्जिकल स्ट्राईक झाले. तर कॉंग्रेस प्रवक्ता म्हणतो, सहा झाले. माजी लष्करी अधिकार्‍यांनी डॉ. सिंग यांचा खोटेपणा उघड केल्याने डॉ. सिंग हे कुणाच्या तरी सांगण्यावरून विधाने करीत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. सोबतच ही भयावह स्थिती विरोधकांसाठी मोदींनी निर्माण केली काय, असाही प्रश्न विचारला जात आहे.