'ज्यांना मनोरंजनाकरिता राज ठाकरेंचे भाषण आवडतात त्यांनी ते बघावे'
   दिनांक :05-May-2019
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दाखवलेले व्हिडिओ किती खरे आणि किती खोटे असा सवाल उपस्थित करतानाच ‘ज्यांना मनोरंजनाकरिता राज ठाकरेंचे भाषण आवडतात त्यांनी ते बघावे आणि टाळ्या वाजवाव्यात’, असा टोला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी लगावला आहे.
 

 
विक्रम गोखले हे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी राज ठाकरे, मोदी सरकारची कामगिरी अशा विविध मुद्द्यांवर परखड मत मांडले. सैन्यातील जवानांपेक्षा व्यापारी जास्त धाडसी असतो, असे विधान करतानाचा मोदींचा व्हिडिओ राज ठाकरे यांनी प्रचारसभांमध्ये वारंवार दाखवला होता. याबाबत प्रश्न विचारले असता विक्रम गोखले यांनी ज्यांना मनोरंजनाकरिता राज ठाकरेंचे भाषण आवडतात त्यांनी ते बघावे आणि टाळ्या वाजवाव्यात, असे सांगितले.” त्यांचे व्हिडिओ किती खरे आणि किती खोटे आहेत. निवडणूक आल्यावर असे व्हिडिओ जे व्हायरल होतात, त्याची आपण शहानिशा केली पाहिजे”, असेही विक्रम गोखले यांनी सांगितले.
नोटाबंदीबाबतही त्यांनी भाष्य केले. नोटाबंदीमुळे काळा पैसा कधीही परत आणता येणार नाही, मोदींनी केलेल्या नोटाबंदीमुळे काहीही साध्य झालेले नाही. बुलेट ट्रेनला देशातील सरकारने प्राधान्य देऊ नये, देशाने शेतकऱ्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. एकट्या राजाने चांगले वागून चालत नाही. तर त्याच्यासोबतच्या प्रत्येकाने चांगले वागले पाहिजे.
शरद पवार हे दुरदृष्टी असलेले नेते आहेत, पण त्यांनी बारामतीचा जसा विकास केला, तसा संपूर्ण महाराष्ट्राचा का नाही केला, असा सवालही विक्रम गोखले यांनी विचारला.