श्रीलंकेतून २०० धर्मगुरूंची हकालपट्टी
   दिनांक :06-May-2019
श्रीलंकेत ईस्टर संडे दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमागे स्थानिक जिहादी गटाचा हात असल्याचे समोर आल्यानंतर, श्रीलंकेने व्हिसाची मुदत उलटून गेलेल्या परदेशी नागरिकांवर कारवाई तीव्र केली आहे. श्रीलंकेतून ६०० परदेशी नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आले असून यामध्ये २०० मुस्लिम धर्मगुरूंचाही समावेश आहे.
 
 
श्रीलंकेचे गृहमंत्री वजिरा अबेवर्देना यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांनी कायदेशीर मार्गांनी श्रीलंकेत प्रवेश केला होता. मात्र बॉम्बस्फोटांनंतर सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या कारवाईत व्हिसाची मुदत उलटून गेल्यानंतरही ते देशात राहत असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना दंड ठोठावत त्यांची देशाबाहेर पाठवणी करण्यात आली. सध्या व्हिसा प्रणालीचा फेर आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू असून धर्मगुरूंसाठी व्हिसा नियम अधिक कडक करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ईस्टर संडेदिवशी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत २५७ जण मृत्युमुखी पडले होते, तर ५०० हून अधिक व्यक्ती जखमी झाल्या होत्या.