बँकेची तिजोरी सापडली नदीपात्रात
   दिनांक :06-May-2019
वाशीम,
मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत शुक्रवार ३ मे रोजी रात्री दरम्यान अज्ञात चोरांनी प्रवेश करुन तिजोरीसह १५ लाखाची रक्कम लंपास केली होती. या धाडसी चोरीने पोलिस प्रशासनासह बँक प्रशासनात एकच खळबळ उडाली. यामध्ये अज्ञात चोरांनी चोरुन नेलेली तिजोरी राष्ट्रीय महामार्गावरील काटेपूर्णा नदीच्या वरच्या भागात शोधून काढण्यास श्‍वान पथकाला आज सोमवारी यश आले. 

 
 
जि. म. बँकेच्या किन्हीराजा शाखेत शुक्रवार ३ मे रोजी अज्ञात चोरांनी मुख्य गेटचे कुलूप तोडून बँकेतील १४ लाख ८९ हजार २९४ रुपये रोख रकमेची तिजोरी वाहनात घालून लंपास केली होती. या चोरीने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. चोरांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले. या प्रकरणामुळे बँक प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड झाला. बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते तसेच सुरक्षा रक्षकही नसल्याचा फायदा चोरांनी घेतला. या धाडसी चोरीच्या माग काढण्यासाठी श्‍वान पथक, ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. परंतु, चोरांचा मागोवा लागला नाही. तीन दिवसाच्या तपासानंतर चोरीला गेलेली तिजोरी काटेपूर्णा नदीपात्रात वरच्या भागात आढळून आली आहे.
 
बँकेच्या समोरील किराणा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात अज्ञात चोर कैद झाल्याची माहिती प्राप्त आहे. पोलिस सखोल तपास करीत असताना श्‍वान पथकाने तिजोरीचा तपास लावल्याने लवकरच आरोपी देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकतील, अशी अपेक्षा आहे.