वाशीमच्या बेनिवाले यांची आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंच पदी नियुक्ती

    दिनांक :06-May-2019
वाशीम, 
इंडो आंतरराष्ट्रीय प्रीमियर कबड्डी लीग या स्पर्धांसाठी पंच अधिकारी म्हणून क्रीडा शिक्षक हित्वा बेनिवाले यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. इंडो इंटरनॅशनल कबड्डी असोसिएशनचे सहसचिव व न्यू विदर्भ कबड्डी असोसिएशन नागपूर चे अध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर यांनी एका पत्राद्वारे सदर निवड केली आहे.
 
 
तालुक्यातील सुरकंडी येथील रहिवासी असलेले व वाशीम येथील परमवीर अब्दुल हमीद उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये शारीरिक शिक्षक असलेले हित्वा बेनिवाले यांनी आजतागायत देशभरात विविध ठिकाणी कबड्डी सामन्यांमध्ये उत्कृष्ट कबड्डी पंच म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांना पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांचे पंच म्हणून निवडण्यात आले आहे. हे सामने पुणे येथे 13 ते 21 मे, कर्नाटकातील म्हैसूर येथे 24 ते 29 मे आणि बेंगलोर येथे 1 ते 4 जून दरम्यान पार पडणार आहेत. या सामन्यांमध्ये 41 देशातील कबड्डी खेळाडू सहभागी होणार आहेत. या सामन्यांचे विविध वाहिन्यांवर लाईव्ह प्रसारण देखील केले जाणार आहे.
 
निवडीबद्दल प्रतिक्रिया देतांना बेनिवाले म्हणाले की, मी गेल्या 20 वर्षांपासून कबड्डी पंच म्हणून कामगिरी करत आहे. या सामन्यांच्या माध्यमातून मला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यांचे पंच म्हणून निवडण्यात आले आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे. मला दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडणार आहे असे त्यांनी सांगितले. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळाले असून त्यांचे कौतुक होत आहे.