प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची भीषण हत्या
   दिनांक :06-May-2019
- श्रीराम गावंडे व पुत्रांवर हत्येचा गुन्हा दाखल

 
 
अकोला,
अकोल्यातील प्रापर्टी ब्रोकर तथा सामाजिक कार्यकर्ते किसनराव हुंडीवाले यांची आज सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात भर दुपारी १२ च्या सुमारास हत्या करण्यात आली. ही हत्या शिक्षण संस्थेच्या निवडणूक व लाचलुचपत विभागातील तक्रारीच्या अनुषंगाने झाल्याची तक्रार हुंडिवाले यांच्या मुलाने पोलिसांकडे केली आहे.
 
या हत्याकांडात माजी पोलिस अधिकारी व अकोला महापालिकेच्या प्रथम महापौर सुमन गावंडे यांचे पती श्रीराम गावंडे व त्यांचे तीन मुलं रणजीत, प्रवीण आणि विक्रम यांच्यासह इतराचाही समावेश असल्याची माहिती पोलिस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांनी दिली.
 
श्रीराम कसदन गावंडे यांच्याशी किसनराव हुंडीवाले यांचा शैक्षणिक संस्थेच्या व्यवस्थापन निवडीवरुन वाद होता. तो वाद येथील सार्वजनिक न्यास कार्यालयात सुरु होता. येथील खेतान नगर स्थित स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या अंतर्गत स्वामी विवेकानंद इंग्लिश हायस्कूल, खेतान नगर आणि स्वामी विवेकानंद प्राथमिक मराठी शाळा, तुकाराम चौक, मलकापूर या संस्थेच्या व्यवस्थापनामधील निवड प्रक्रियेतील वादाच्या कारणावरून व लाचलुचपत विभागात श्रीराम गावडे यांच्या विरुद्ध केलेल्या तक्रारीच्या कारणावरून आरोपींनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात आज सुनावणीच्या दिवशी आग विझवण्याच्या सिलेंडरने डोक्यावर वार करुन किसनराव यमाजी हुंडीवाले (65) रा. खडकी यांना निर्दयतेने मारहाण करून खून केला.
 
भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम उर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे सर्व रा.कौलखेड, सतीश तायडे, विशाल तायडे, साबीर व इतर चार पाच जणांनी ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी माजी महापौर व भाजपा नगरसेविका सुमन गावंडे व त्यांच्या स्नुषा यांना चौकशीसाठी घरुन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. त्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.