करात सवलत मिळण्यासाठी...
   दिनांक :06-May-2019
करात सवलत मिळवण्यासाठी विविध प्रकारची गुंतवणूक करण्याकडे करदात्यांचा कल असतो. जीवन विम्यापासून शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीपर्यंत बर्‍याच गोष्टींवर करात सवलत मिळण्याची तरतूद आहे. पण या पलीकडे जाऊन करसवलतीचे इतर पर्याय धुंडाळणार्‍यांनी ‘टॅक्स सेव्हिंग बॉंड’ तसंच ‘टॅक्स फ्री बॉंड्‌स’चा विचार करायला हरकत नाही. हे दोन्ही बॉंड्‌स गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असले तरी याबाबत लोकांमध्ये बराच संभ्रम असतो. हाच संभ्रम दूर करण्याचा एक प्रयत्न...
 
 
‘टॅक्स फ्री बॉंड’ आणि ‘टॅक्स सेव्हिंग बॉंड’ हे गुंतवणुकीचे पूर्णपणे वेगळे पर्याय आहेत. भिन्न प्रवृत्तीच्या गुंतवणूकदारांसाठी या बॉंड्‌सची रचना करण्यात आली आहे. एका बॉंडमध्ये गुंतवणूकदारांना मुद्दलीवर करात सवलत दिली जाते तर दुसर्‍यावरचं व्याज पूर्णपणे करमुक्त आहे. एका बॉंडचा ‘लॉक इन’ कालावधी पाच वर्षांचा असतो तर दुसर्‍याला कोणताही ‘लॉक इन’ कालावधी नसतो. टॅक्स सेव्हिंग बॉंड्‌स नावाप्रमाणे गुंतवणूकदारांना करबचतीचे लाभ देतात. यामुळे करदाते भराव्या लागणार्‍या एकूण करापैकी थोडी रक्कम वाचवू शकतात.
 
आयकर कायद्यातल्या कलम ‘80 सीसीएफ’मध्ये टॅक्स सेव्हिंग बॉंड्‌ससंदर्भात विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार करदात्यांना करात वीस हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळू शकते. म्हणजे तुमच्या वार्षिक करपात्र उत्पन्नातून 20 हजार रुपये वजा होऊ शकतात. या बॉंड्‌सचा ‘लॉक इन’ कालावधी पाच वर्षांचा असतो. फारसा धोका पत्करण्याची तयारी नसलेल्यांसाठी हा पर्याय योेग्य ठरतो. आयकर कायद्यातल्या कलम 10 नुसार टॅक्स फ्री बॉंड्‌सवरचं व्याज पूर्णपणे करमुक्त असतं पण यात गुंतवलेल्या रकमेवर करसवलतीचे कोणतेही लाभ मिळत नाहीत. ही दीर्घकालीन गुंतवणूक 20 वर्षांपर्यंत करता येते.