रशियात विमानाला आग; ४१ जणांचा मृत्यू
   दिनांक :06-May-2019
मॉस्को,
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये इमर्जन्सी लँडिंग दरम्यान सुखोई सुपरजेट १०० विमानाला आग लागली. यामध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. मॉस्कोच्या विमानतळावर ही घटना घडली. यावेळी अनेक प्रवाशांना इमर्जन्सी स्लाईड्सच्या माध्यमातून बाहेर काढण्यात यश आले.
 
सुखोई प्रवासी विमानाने मॉस्को विमानतळावरुन उत्तर रशियातल्या मोरशांस्कला जाण्यासाठी उड्डाण केले होते. यामध्ये ७३ प्रवासी आणि ६ कर्मचारी होते. विमानात दुर्घटनेवेळी एकूण ३८ जण होते. यातल्या ४१ जणांचा जीव वाचवण्यात यश आल्याची माहिती या अपघाताचा तपास करणाऱ्या पथकाचे प्रवक्ते स्वेतलाना पेट्रेन्को यांनी दिली. विमान झेपावताच त्यातून धूर निघू लागला. याची माहिती वैमानिकानं विमान वाहतूक नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर विमानानं एमर्जन्सी लँडिंग केले.
 
 
विमानाने इमर्जन्सी लँडिंग करेपर्यंत त्याचा जवळपास निम्मा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यात विमानाला लागलेल्या आगीची भीषणता अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. विमान दोन वर्षे जुने होते, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. विमानाला लागलेल्या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.