धक्कादायक ! रुग्णालयाच्या सूपमध्ये निघाले रक्ताने माखलेले बोळे

    दिनांक :06-May-2019
पुणे: पुण्याच्या जहांगीरच्या रुग्णालयामध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रसूती झालेल्या महिलेला पिण्यासाठी देण्यात आलेल्या सूपमध्ये चक्क रक्ताने माखलेले कापसाचे बोळे निघाले. या धक्कादायक प्रकारामुळे जहांगीर रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या बद्दल अधिक माहिती अशी की, महेश सातपुते यांच्या पत्नी  वीणा यांना प्रसूतीसाठी २८ एप्रिल रोजी जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्या प्रसूत झाल्या. दुसऱ्या दिवशी रुग्णालयाच्या सेवा देणाऱ्या व्यक्तीने त्यांना सकाळी पिण्यासाठी थर्मासमध्ये सूप दिले. मात्र, वीणा यांनी ते लगेच घेतले नाही. दोन तासांनी ते सूप रुग्णालयाच्या व्यक्तीने परत गरम करून आणून दिले असता त्यामध्ये रक्ताने माखलेले दोन कापसाचे बोळे आढळून आले. या प्रकरणी रुग्ण महिलेच्या पतीने कोरेगाव पार्क पोलिस ठाणे, अन्न व औषध प्रशासन आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. हा प्रकार सातपुते यांनी रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर  रुग्णालयाने संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. एक मे रोजी वीणा यांना डिस्चार्जही दिला. दरम्यान या तक्रारीची दखल न घेतल्याने सातपुते यांनी या प्रकाराची लेखी तक्रार पोलिसांत दाखल केली व सर्व पुरावेही दिले. मात्र, अद्याप रुग्णालयाविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे सातपुते यांनी सांगितले.