पंजाबी, जाट, शीख मतदार प्रभावी
   दिनांक :06-May-2019
नवी दिल्ली: पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार प्रवेश वर्मा, कॉंग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्रा आणि आपचे बलबीर जाखड यांच्यात तिरंगी लढत होत आहे. पश्चिम दिल्ली हा पूर्वांचली आणि जाटबहुल मतदारसंघ असला तरी या मतदारसंघात शीख आणि पंजाबी मतदार निर्णायक ठरणार आहेत.
2008 मध्ये पश्चिम दिल्ली मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यामुळे या मतदारसंघाला फारसा जुना इतिहास नाही. 2009 मध्ये या मतदारसंघात पहिल्यांदा लोकसभा निवडणूक झाली. यावेळी कॉंग्रेसचे महाबल मिश्रा यांनी भाजपाचे जगदीश मुखी यांचा पराभव केला होता. महाबल मिश्रा यांना 4 लाख 79 हजार 899 तर जगदीश मुखी यांना 3 लाख 50 हजार 889 मते मिळाली होती. बसपा उमेदवार यावेळी तिसर्‍या स्थानावर होता.
 

 
 
2014 च्या निवडणुकीत प्रवेश वर्मा यांनी आपचे जर्नेलिंसह यांना 2 लाख 68 हजार 586 मतांनी पराभूत केले होते. भाजपाचे प्रवेश वर्मा यांना 6 लाख 51 हजार 395 तर आपचे जर्नेलिंसह यांना 3 लाख 82 हजार 809 मते पडली होती. कॉंग्रेसचे उमेदवार आणि या मतदारसंघातील खासदार महाबल मिश्रा 1 लाख 93 हजार 266 मते घेत तिसर्‍या स्थानावर होते.
महाबल मिश्रा या भागातून आमदार म्हणून तीनवेळा निवडूनही आले होते. मात्र 2014 मध्ये त्यांचा पराभवच झाला नाही, तर ते तिसर्‍या स्थानावर फेकल्या गेले. यामुळे आपल्या पराभवाचा बदला घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. प्रवेश वर्मा हे या मतदरसंघातील भाजपाचे विद्यमान खासदार आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबिंसह वर्मा यांचे प्रवेश वर्मा हे पुत्र. आपली खासदारकी कायम ठेवण्यासाठी प्रवेश वर्मा लढत आहे.
कॉंग्रेस आणि आप यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू असतानाही आपने पश्चिम दिल्ली वगळता अन्य सहा लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारांची घोषणा करुन टाकली होती. त्या तुलनेत या मतदारसंघातील आपच्या उमेदवाराची घोषणा उशिरा झाली. मतदारसंघाची रचना पाहून पाहून आपने बलबिरिंसग जाखड यांना रिंगणात उतरवले आहे.
पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात मादीपूर, जनकपुरी, विकासपुरी, द्वारका, राजौरी गार्डन, मटिआला, हरिनगर, उत्तमनगर, नजफगड आणि तिलकनगर असे विधानसभेचे दहा मतदारसंघ येतात. यातील राजौरी गार्ड वगळता अन्य सर्व मतदारसंघ आपच्या ताब्यात आहे. 2017 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत अकाली दलाशी युती करत भाजपाने राजौरी गार्डन मतदारसंघ आपल्याकडे घेतला होता.
यावेळी 23 लाख 59 हजार 915 मतदार असून, यात पुरुष मतदारांची संख्या 12 लाख 72 हजार 792 तर महिला मतदारांची संख्या 10 लाख 87 हजार 37 आहे. या मतदारसंघात 21 टक्के ओबीसी, 12.98 टक्के दलित, 12.53 टक्के अन्य, 12.90 टक्के पंजाबी, 10 टक्के पंडित, 9.2 टक्के जाट, 8.29 टक्के शीख, 6.6 टक्के मुस्लिम, 6.5 टक्के वैश्य अशी जातीनिहाय मतदारांची टक्केवारी आहे.
भाजपाचे प्रवेश वर्मा आणि आपचे जाखड हे दोघेही जाट तर कॉंग्रेसचे महाबल मिश्रा हे पूर्वांचली. यामुळे या मतदारसंघात जाट मत विभागली जाण्याची शक्यता वाढली आहे. कॉंग्रेसचे महाबल मिश्रा पूर्वांचली असले तरी सगळी पूर्वांचली मते त्यांना मिळणे कठीण दिसते, या मतदारांवर भाजपाचाही चांगला प्रभाव आहे. त्यामुळे पंजाबी आणि शीख मते ज्या बाजूला वळतील, त्याचे पारडे या मतदारसंघात जड होईल.
2009 मध्ये कॉंग्रेसने तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनिंसग यांच्या नावावर येथील निवडणूक लढवली होती. डॉ. मनमोहनिंसग यांनी या मतदारसंघात प्रचार केल्यामुळे शीख आणि पंजाबी मते कॉंग्रेसच्या बाजूला गेली आणि महाबल मिश्रा यांचा विजय झाला होता.
पश्चिम दिल्ली मतदारसंघात आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना रोडशो दरम्यानच दिल्लीचे मुख्यमंत्री अरिंवद केजरीवाल यांच्या थोबाडीत मारण्यात आली होती.
भाजपाचे प्रवेश वर्मा मोदी सरकारच्या विकास कामावर मते मागत आहे. राष्ट्रवादाचा मुद्दाही भाजपाला फायदेशीर ठरत आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्याचा मुद्दा प्रचारात प्रभावी ठरत आहे. त्यामुळे मतदारही उमेदवाराकडे न पाहता नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान करण्याच्या मनस्थितीत आहे. याचा फायदा फक्त दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशभरात भाजपाच्या उमेदवारांना मिळत आहे.
दुसरीकडे कॉंग्रेस आणि आप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलत आपला प्रचार करत आहे. मोदींनी पाच वर्षात काहीच केले नाही, हा या दोन्ही पक्षांचा मुद्दा मतदारांना पचत नाही. 12 मेला या मतदारसंघात मतदान असल्यामुळे प्रचाराने वेग घेतला आहे. सर्वच उमेदवार जिवाचे रान करत आहे. मतदार कोणाला कौल देतात, याचा निर्णय 23 मेला होणार आहे.