वर्ल्ड कपच्या तयारीला गेलेल्या पाकिस्तान संघाचा पराभव

    दिनांक :06-May-2019
कार्डिफ, इंग्लंड वि. पाकिस्तान,
 
30 मे पासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या पाकिस्तान संघाचा ट्वेंटी-20 सामन्यात पराभव झाला. पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी यजमान इंग्लंडविरुद्ध 1 ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिल्या व एकमेव ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जो रूट यांच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने हा सामना 7 विकेट राखून सहज जिंकला.
 
सराव सामन्यात खोऱ्याने धावा करणाऱ्या पाकिस्तानचा फलंदाजांना इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर फार काही करिष्मा करता आला नाही. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाक संघाला 6 बाद 173 धावांपर्यंत मजल मारता आली. फखर जमान ( 7), इमाम उल-हक ( 7) यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. बाबर आझम ( 65) आणि हॅरिस सोहेल ( 50) यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. इंग्लंडकडून ट्वेंटी-20त पदार्पण करणाऱ्या जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला तिसऱ्याच षटकात धक्का बसला. त्यांचा सलामीवीर बेन डकेट ( 9) शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मात्र, त्यानंतर जेम्स व्हिंस आणि जो रूट यांनी इंग्लंडचा डाव सावरला. व्हिंस 27 चेंडूंत 36 ( 3 चौकार व 1 षटकार) धावा करून बाद झाला. रूट व कर्णधार मॉर्गन यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना यश मिळवू दिले नाही.