‘गंभीरलाच उपचाराची गरज आहे, तू पाकिस्तानात ये’

    दिनांक :06-May-2019
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलाच विकोपाला आहे. गंभीर हा घमेंडी, अतिआत्मविश्वासू असल्याचा आरोप आफ्रिदीने आपल्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रात केला होता. त्यावर आफ्रिदीला मानसोपचारतज्ज्ञांकडे नेण्याची गरज आहे, असा टोला गंभीरने मारला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना ‘गंभीरलाच उपचारांची गरज आहे, तू पाकिस्तानात ये’, असे आफ्रिदीने म्हटले आहे.
 

 
‘‘आम्ही कराचीमध्ये गंभीरसारख्या व्यक्तींना नासक्या वृत्तीचे म्हणून संबोधतो. मला आनंदी, सकारात्मक वृत्तीची माणसे आवडतात. ते आक्रमक असोत वा स्पर्धात्मक, त्याने मला काहीही फरक पडत नाही. पण त्यासाठी तुम्ही सकारात्मक असायला हवे. गंभीर या पठडीत मोडणार नाही,’’ असे आफ्रिदीने म्हटले आहे.
आफ्रिदीला मानसोपचारतज्ज्ञांकडे नेण्याची गरज आहे, या गंभीरच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना आफ्रिदी म्हणाला की, ‘‘क्रिकेटकडून राजकारणाकडे वळलेल्या गंभीरला बऱ्याच समस्या आहेत, त्यावर पाकिस्तानात उपचार होऊ शकतात. मी काही रुग्णालयांसोबत काम करत असून त्याच्यावर पाकिस्तानात चांगल्या पद्धतीचे उपचार होऊ शकतात.’’
गंभीरच्या व्हिसाची संपूर्ण प्रक्रिया करण्याचा प्रस्तावही आफ्रिदीने ठेवला आहे. ‘‘भारत सरकार आमच्या लोकांना शक्यतो व्हिसा देत नाही. मात्र भारतातून पाकिस्तानात येणाऱ्या प्रत्येकाचे मी स्वागत करू इच्छितो. आमची जनता किंवा सरकार, भारतीय लोकांच्या स्वागतासाठी सदैव तत्पर असते. गंभीरसाठी मी व्हिसा मिळवून देऊ शकतो, ज्यामुळे त्याच्यावर चांगले उपचार होऊ शकतात,’’ असा टोलाही आफ्रिदीने हाणला आहे.