48 तासांत विकली गेली भारत-पाक सामन्याची तिकिटं

    दिनांक :06-May-2019
 नवी दिल्ली, आयसीसी वर्ल्ड कप 2019 :
 
भारत-पाक क्रिकेट सामना म्हटला की दोन्ही देशांतील चाहत्यांसाठी जणू पर्वणीच. त्यात वर्ल्ड कप संघात उभय संघ एकमेकांना भिडणार असतील तर त्याची याची देही याची डोळा अनुभव घेणे कोणाला आवडणार नाही. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात १६ जूनला ओल्ड ट्रॅफर्डवर सामना होणार आहे. हा सामना प्रत्यक्ष पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची झुंबड उडालेली पाहायला मिळणार आहे. अवघ्या 48 तासांत या सामन्यांची सर्व तिकिटं विकली गेल्याची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली आहे.

या सामन्यासाठी आयोजकांना सतत फोन येत आहेत आणि हे अधिक फोन भारतातून येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. याच मैदानावर 26 जूनला भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना होणार आहे, परंतु त्यासाठी इतकी उत्सुकता कोणी दाखवलेली नाही. वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सहाही सामन्यांत भारताने बाजी मारलेली आहे.