माथेरानला फिरायला गेलेल्या महिलेचा दरीत कोसळून मृत्यू
   दिनांक :06-May-2019
 
ठाणे:  मौज मजा म्हणून माथेरानला फिरायला जाणे एका महिलेलच्या जीवावर बेतले. माथेरान येथे फिरायला गेलेल्या मुंबईतील एका महिलेचा ८०० फूट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गिता मिश्रा असे या महिलेचे नाव असून, त्या पती व दोन मुलींसह माथेरानला शनिवारी फिरायला गेल्या होत्या. गीता या पती आणि मुलींसमोरच दरीत पडल्याची अनपेक्षित घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सह्याद्री रेस्क्यू टीमने खोल दरीत उतरून तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढला.

 
 
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील दिवा भागात राहणाऱ्या गिता मिश्रा या आपले पती, दोन मुली आणि एका मित्रासह शनिवारी सकाळी माथेरानला फिरायला गेल्या. दुपारी अडीचच्या सुमारास बेलविडीयर पाँईट येथे ते आले असता गिता यांच्या पायाला ठेच लागली. ठेच लागल्यानंतर गिता यांचा तोल गेला आणि त्या घसरत ८०० फूट खोल दरीत कोसळल्या. त्यांच्या पतीने घटनेची माहिती स्थानिकांना दिली. त्यानंतर माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीमने त्यांचा शोध सुरू केला. अखेर तीन तासांनी रेस्क्यू टीम गिता यांच्यापर्यंत पोहचली. मात्र, तोपर्यंत खूप उशिर झाला होता. गिता यांचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.