आयुष्यमान कार्ड नाकारल्यानेच गरीब रुग्णाचा अमेठीत मृत्यू
   दिनांक :06-May-2019
केंद्र सरकारतर्फे पुरस्कृत पाच लाखापर्यंत वैद्यकीय मदत देणारे आयुष्यमान भारत कार्ड असूनही राहुल गांधी यांच्या परिवारातील सदस्य असलेल्या विश्वस्तांनी कार्ड नाकारल्याने एका गरीब माणसाचा अखेर मृत्यू झाला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्वाल्हेर येथील सभेत केला.
 
 
 
 
आम्ही गरिबांसाठी ही योजना आणली. पण, राजस्थान आणि छत्तीसगडसारख्या कॉंग्रेसशासित राज्यांनी अजूनही ही योजना लागू केलेली नाही. जनता त्यांना योग्य धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. अमेठीच्या घटनेचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, अमेठीत इस्पितळात रुग्ण आला असता, त्याला दाखल तर करून घेतले. पण, हे इस्पितळ मोदी यांचे नाही, असे सांगून त्याला उपचार नाकारण्यात आले. त्यामुळे त्या गरीब माणसाची दुर्देवी मृत्यू झाला. हे इस्पितळ गांधी कुटुंबीयांचे विश्वस्त चालवितात. कॉंग्रेसने नेहमीच गरिबांप्रती नेहमी असंवेदनशीलता दाखविली आहे. अमेठीतील रुग्णाचा मृत्यू हे त्याचे प्रमाण आहे.
तिकडे अमेठीत या घटनेवरून प्रचंड वादळ उठले आहे. मरण पावलेल्या इसमाच्या नातेवाईकांनी सांगितले की, यापूर्वी संजय गांधी इस्पितळात आमच्या काकांना केवळ यासाठी उपचार नाकारण्यात आले की, या इस्पितळात आयुष्यमान योजना लागू होत नाही. यामुळे आमच्या काकांचाही मृत्यू झाला होता. अमेठीच्या भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनीही ट्विटरवरून त्यांची माहिती दिली.
विरोधक म्हणतात, मोदी हटाओ. जनता म्हणत आहे, फिर एक बार मोदी सरकार. कॉंग्रेस सरकारने दहशतवाद आणि नक्षलवाद याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. आम्ही गरिबांना पाणी पुरविण्यासाठी जल शक्ती मंत्रालय सुरू करणार आहोत. त्यामुळे देशातील सर्व गरिबांना पिण्याचे मुबलक पाणी मिळू शकेल. अमेठीत उद्या सोमवारी मतदान होणार आहे.