मुझफ्फरपूर आश्रयगृह प्रकरणी 3 जूनपर्यंत स्थिती अहवाल सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचे सीबीआयला आदेश
   दिनांक :06-May-2019
 
नवी दिल्ली, 
 मुझफ्फरपूर आश्रयगृहातील 11 मुलींच्या कथित हत्येप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा स्थितीदर्शक अहवाल 3 जूनपर्यंत सादर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी सीबीआयला दिले आहेत.
 

 
 
या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता याची सुनावणी 3 जून रोजी अंशकालीन न्यायासनासमोर केली जाईल, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या न्यायासनाने यावर सुनावणी करताना आज स्पष्ट केले.
 
मुझफ्फरपूर आश्रयगृहात 11 मुलींची हत्या करण्यात आली आणि पोलिसांनी त्यांना पुरलेल्या ठिकाणावरून काही मानवी हाडे जप्त केली आहेत, असे सीबीआयच्या वतीने युक्तिवाद करताना महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, सीबीआय या प्रकरणाचा तपास 3 जूनपर्यंत पूर्ण करू शकणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
या प्रकरणी तपाससंस्था पारदर्शी, निष्पक्ष आणि परिपूर्ण चौकशी करीत असल्याचे सीबीआयने यावेळी न्यायालयाला सांगितले आहे. आश्रयगृहाच्या नोंदणीच या 11 मुलींची नावे आहेत. एकाच नावाच्या 35 मुली आढळल्या असून, त्यांनी एकवेळा िंकवा अनेकवेळा मुझफ्फरपूर आश्रयगृहात मुक्काम केला आहे, असेही सीबीआयने न्यायालयास सांगितले.