फनी चक्रीवादळ; ओडिशाला केंद्राची १००० कोटींची मदत
   दिनांक :06-May-2019
पंतप्रधान मोदी यांनी आज वादळग्रस्त ओडिशाची हवाई पाहणी केली. त्यानंतर फनी चक्रीवादळग्रस्त ओडिशा राज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ओडिशाचे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्ववत करण्यासाठी या पूर्वी देखील केंद्र सरकारने ओडिशाला ३८१ कोटी रुपयांची मदत दिल्याचेही पंतप्रधान म्हणाले. या वेळी पंतप्रधानांनी चक्रीवादळाला समर्थपणे तोंड देणाऱ्या मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह ओडिशाच्या जनतेची प्रशंसा केली.
 
 
पंतप्रधान मोदी आज सकाळी भुवनेश्वर येथे पोहोचले. येथे त्यांनी चक्रीवादळग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पटनायक आणि इतर अधिकाऱ्यांची समीक्षा बैठकही बोलावली. हवाई पाहणीदरम्यान पंतप्रधानांसोबत राज्यपाल गनेशी लाल, मुख्यमत्री नवीन पटनायक आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.
 
 
या भयंकर वादळानंतर केंद्र आणि ओडिशा राज्यादरम्यानचा संवाद अतिशय चांगला झाला. मी स्वत: देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो, असे मोदी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ओडिशाच्या लोकांनी सरकारच्या निर्देशांचे उत्तम प्रकारे पालन केले आहे असेही मोदी म्हणाले.