'दोन कोटी रोजगार तर माझ्याच मंत्रालयाने दिले'
   दिनांक :06-May-2019
नवी दिल्ली, 
 
दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते, ते वचन पाळले नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे; खरे म्हणजे, गेल्या पाच वर्षांत यापेक्षाही कितीतरी जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे. केवळ माझ्याच मंत्रालयाने दोन कोटी लोकांना रोजगार दिला आहे, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
 

 
 
एका हिंदी दैनिकाला दिलेल्य मुलाखतीत गडकरी बोलत होते. माझ्या विभागाने 17 लाख कोटींची कामे दिली आहेत, ती केंद्र सरकाच्या बजेटपेक्षा जास्त आहे. दोन कोटी रोजगार माझेच खाते देत आहे. त्याचे आकडे आहेत. इ-रिक्षा पाहा. एक कोटी लोक हातरिक्षा चालवत होते, आता ते इ-रिक्षावर आले आहेत. हा रोजगार नाही का? दिल्लीच्या पोलिस आयुक्तांनी सांगितले की, इ-रिक्षामुळे रोजगार मिळाल्याने राजधानीत गुन्हे घटले आहेत, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.
 
गंगा स्वच्छतेच्या मुद्यावर गडकरी म्हणाले की, गंगा बर्‍याच प्रमाणात स्वच्छ झाली आहे. अलाहाबादहून कानपूर आणि हरिद्वारपर्यंत काही अडचणी आहेत. यापूर्वीच्या कुंभमेळात घाण पाणी पाहून मॉरिशसचे पंतप्रधान स्नान न करताच गेले होते. यावेळच्या कुंभमेळ्यात गंगा स्वच्छ होती. पुढील मार्चपर्यंत शंभर टक्के काम होणार आहे. 26 हजार कोटींचे प्रकल्प आणत आहोत. पाणी स्वच्छ नसते तर प्रियांका वढेरा गंगेचे पाणी प्यायल्या असत्या का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 
2014 मध्ये काँग्रेसप्रणीत संपुआबद्दल लोकांच्या मनात प्रचंड नाराजी होती. भाजपाने नरेंद्र मोदी यांची रालोआचे नेते म्हणून निवड केली, तेव्हा जनतेच्या मनात आशा निर्माण झाली. मोदी यांच्या नेतृत्वात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. आपण सत्तेत येणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे काँग्रेसने  ‘न्याय’ योजना आणण्याचे आश्वासन दिले, असा टोला गडकरी यांनी हाणला.
मोदीच पंतप्रधान
 
पंतप्रधानपदाची अपेक्षा मला नाही. नरेंद्र मोदी हेच या पदाचे उमेदवार आहेत आणि आताही तेच पंतप्रधान होतील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. पंतप्रधानपद हा माझा विषय नसल्याचे मी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे, असे सांगताना, 2014 मध्ये भाजपाने जितक्या जागा जिंकल्या  होत्या, त्यापेक्षा जास्त जागा भाजपा यावेळी जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.