काँग्रेसला मतदान करण्यासाठी जबरदस्ती; इराणींचा राहुल गांधींवर आरोप
   दिनांक :06-May-2019
नवी दिल्ली ,
लोकसभा निवडणुकीसाठी आज सात राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदानाची ही पाचवी फेरी असून, त्यामध्ये 674 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. 8 कोटी 75 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. अमेठी मतदारसंघात बळजबरीने राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंदावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी केला आहे. स्मृती इराणी यांनी याबाबतचा एक व्हिडीओही ट्वीट केला आहे. काँग्रेसला मतदान करण्यासाठी आपल्यावर सक्ती करण्यात आली असल्याचा आरोप एका महिलेने या व्हिडीओमध्ये केला आहे.
 
 
महिलेने 'माझा हात पकडून जबरदस्तीने काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेले बटण दाबायला लावले. मला भाजपाला मतदान करायचे होते' असे व्हिडीओमध्ये म्हटले आहे. या घटनेनंतर स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच प्रशासन आणि निवडणूक आयोगाला सर्तक करण्यासाठी मी हा व्हिडिओ ट्वीट केला. ते कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. राहुल गांधींना अशा प्रकारच्या राजकारणासाठी शासन करायचे की नाही ते या देशातील जनतेला ठरवायचे आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.