दोन लोकशाहीमधील दोन चौकशा!

    दिनांक :06-May-2019
दिल्ली दिनांक  
 
 रवींद्र दाणी 
 
 
जगातील दोन मोठ्या लोकशाहींमध्ये सुरू असलेल्या दोन चौकशांकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच तेथील निवडणुकीत दुसर्‍या एका देशाने- रशियाने- हस्तक्षेप केल्याच्या आरोपाची चौकशी केली जात आहे; तर दुसरीकडे भारतात- सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांविरुद्ध एका महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी केली जात आहे. अमेरिकेत झालेली व होत असलेली चौकशी, राष्ट्रपती ट्रम्प यांचे 2020 च्या निवडणुकीत भवितव्य ठरविणारी ठरणार आहे; तर भारतात, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली चौकशी या संस्थेची विश्वसनीयता ठरविणार आहे.
 

 
 
मुल्लर अहवाल
2016 मध्ये झालेल्या अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला होता काय आणि केला असल्यास तो कितपत होता, याची चौकशी करण्यासाठी अमेरिकेच्या न्याय विभागाने नेमलेल्या मुल्लर समितीचा अहवाल, राष्ट्रपती ट्रम्प यांच्यासाठी संकट ठरत आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांनी 2020 ची निवडणूक लढविण्याची घोषणा केली असून, त्यात त्यांना मुल्लर अहवालाचा सामना करावा लागत आहे.
रॉबर्ट मुल्लर हे एफबीआय- फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेटिगेशनचे एक वकील आहेत. अमेरिकेचे ॲटर्नी जनरल विल्यम बार यांनी त्यांना, अमेरिकेच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाची चौकशी करण्यास सांगितले होते. विशेष म्हणजे विल्यम बार यांना राष्ट्रपती ट्रम्प यांनीच अमेरिकेचे ॲटर्नी जनरल नियुक्त केले होते. त्यानंतर विल्यम बार यांनी नियुक्त केलेल्या रॉबर्ट मुल्लर यांनी या प्रकरणाची चौकशी करून सादर केलेला अहवाल अतिशय स्फोटक असल्याचे म्हटले जाते. हा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. रॉबर्ट मुल्लर यांची प्रतिमा, त्यांची विश्वसनीयता पाहता, त्यांनी केलेल्या चौकशीला अतिशय महत्त्व आले असून, हा सारा विषय राष्ट्रपती ट्रम्प यांची अध्यक्षीय कारकीर्द धोक्यात आणणारा ठरू शकतो. तसे एक ट्विटही त्यांनी केले होते.
चार पृष्ठांचे पत्र
रॉबर्ट मुल्लर यांनी आपला सविस्तर अहवाल न्याय विभागाला सादर केल्यानंतर, त्या आधारे ॲटर्नी जनरल विल्यम बार यांनी चार पृष्ठांचे एक पत्र अमेरिकन कॉंग्रेसला पाठविले आहे. त्यावर अमेरिकेन कॉंग्रेस विचार करीत आहे. हे प्रकरण गंभीर झाले ते रॉबर्ट मुल्लर यांच्या एका खुलाशानंतर. आपण सादर केलेला अहवाल आणि त्या आधारे ॲटर्नी जनरलांनी पाठविलेले चार पृष्ठांचे पत्र यात कमालीची तफावत असल्याचे मुल्लर यांनी म्हटले आहे. आपण सादर केलेल्या अहवालातील तथ्य, त्यातील माहिती याचे प्रतििंबब, ॲटर्नी जनरलांनी अमेरिकन कॉंग्रेसला पाठविलेल्या पत्रात नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुल्लर यांनी आपल्या खुलाशात केले आहे. आपला अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही आणि त्या आधारे लिहिण्यात आलेले ॲटर्नी जनरलांचे पत्र मात्र सार्वजनिक झाले असल्याने, आपण केलेल्या चौकशीबाबतच जनतेत संभ्रम निर्माण झाला असल्याचे मुल्लर यांनी आपल्या खुलाशाच्या पत्रात म्हटले आहे.
बचाव
रॉबर्ट मुल्लर यांच्या या खुलाशानंतर ॲटर्नी जनरल विल्यम बार यांनीही खुलासा केला असून, मुल्लर यांचा अहवाल मला मिळाला. ते आता आपले अपत्य असल्याने, त्यावर कोणती भूमिका घ्यावयाची हा अधिकार आपला आहे, असे म्हटले आहे. रॉबर्ट मुल्लर यांनी, अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाची चौकशी केली, अहवाल सादर केला, येथेच त्यांची भूमिका संपली. आता या अहवालाबाबत काय करावयाचे, हे ठरविण्याचा अधिकार न्याय विभागाला म्हणजेच आपल्याला आहे, असेही बार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
अमेरिकन कॉंग्रेसने या प्रकरणी विशेष वकील रॉबर्ट मुल्लर यांना साक्ष देण्यासाठी बोलाविल्यास त्याला आपण आक्षेप घेणार नाही, असेही ॲटर्नी जनरलांनी स्पष्ट केले आहे. म्हणजे ॲटर्नी जनरल विरुद्ध त्यांनी नियुक्त केलेले चौकशी अधिकारी, असे चित्र या प्रकरणात तयार झाले आहे.
मुल्लर अहवाल हे विरोधी पक्षाला- डेमोक्रॅटिक पक्षाला- गवसलेले एक प्रभावी हत्यार ठरत आहे. काही डेमोक्रॅट खासदारांनी तर राष्ट्रपती ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालविण्याची मागणी केली आहे. अमेरिकेत राष्ट्रपतींना हटविण्यासाठी महाभियोग प्रस्ताव आणून तो दोन्ही सभागृहांत पारित करावा लागतो. मुल्लर अहवाल हा अमेरिकेत येणार्‍या कळात होणार्‍या वादगांचे कारण ठरणार आहे.
दुसरी चौकशी
भारतात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात सरन्यायाधीशांना अंतर्गत चौकशीला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यावर गंभीर आरोप लागले आहेत. एक न्यायाधीश न्या. रामस्वामी यांच्यावर तर महाभियोग प्रस्तावही दाखल झाला होता. माजी सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्या विरोधातही विरोधी पक्षांनी महाभियोग प्रस्तावाची नोटीस राज्यसभेच्या अध्यक्षांकडे दिली होती. ती याचिका राज्यसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली होती. याचिकेवर विरोधी पक्षांच्या 63 खासदारांनी सह्या केल्या होत्या. विद्यमान सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्याविरोधात करण्यात आलेली तक्रार जरा वेगळ्या स्वरूपाची आहे. त्यांच्या निवासस्थानी नियुक्त करण्यात आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका महिला कर्मचार्‍याने त्यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार केली आहे. याची चौकशी न्या. बोबडे, न्या. इंदिरा बॅनर्जी व न्या. इंदू मल्होत्रा ही समिती करीत आहे. दरम्यान, या आरोपामागे काही कॉर्पोरेट शक्ती असल्याचा आरोप झाला. त्याची चौकशी करण्यासाठी माजी न्यायाधीश न्या. पटनायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्या. पटनायक यांची विश्वसनीयता चांगली आहे. न्या. पटनायक हे, ओरिसाचे नेते स्व. बिजू पटनायक यांचे जिवलग मित्र होते. बिजू पटनायक मुख्यमंत्री असताना, न्या. पटनायक हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. बिजू पटनायक मुख्यमंत्री असेपर्यंत आपण ओरिसातील उच्च न्यायालयात काम करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. न्या. पटनायक यांच्याकडे या नव्या चौकशीचे काम देण्यात आल्यावर त्यांनी घेतलेला पहिला निर्णय त्यांच्याबद्दल विश्वास वाढविणारा होता. संबधित महिलेने सरन्यायाधीशांवर लावलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण झाल्यावर, आपण आपली चौकशी सुरू करू, असे न्या. पटनायक यांनी घोषित केले, जे योग्य होते. अन्यथा एकीकडे महिलेेने सरन्यायाधीशांवर केलेल्या आरोपांची चौकशी आणि त्याच वेळी सरन्यायाधीशांनी काही शक्तींवर केलेल्या आरोपांंची चौकशी, अशी विसंगत स्थिती तयार झाली असती, जी न्या. पटनायक यांनी टाळली.
 
दरम्यान, सरन्यायाधीशांवर आरोप करणार्‍या महिलेने, आपल्याला न्याय मिळणार नाही असे म्हणत, चौकशीपासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. तीन न्यायाधीशांच्या समितीसमोर दोन वेळा तिची साक्ष नोंदविण्यात आली. समितीने नंतर सरन्यायाधीशांना बोलाविले. त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली. आता समिती आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या सेक्रेटरी जनरलांना सादर करील. सेक्रेटरी जनरल तो अहवाल सर्व 22 न्यायाधीशांना पाठवतील.
सर्वोच्च न्यायालयातील हा सारा घटनाक्रम पाहिल्यावर, न्या. मोहम्मद करीम छागला यांचे स्मरण होते. न्या. छागला हे एक नामवंत वकील होते, न्यायाधीश होते. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात ‘रोझेस इन डिसेंबर’मध्ये लिहिले आहे- ‘आम्ही न्यायाधीश आयुष्यभर इतरांचे निवाडे लिहितो. आमचा निवाडा कोण लिहील?’ या प्रश्नाला न्या. छागला यांचे उत्तर होते- ‘इतिहास आमचा निवाडा लिहीत असतो!’