राज्यात मुद्रांकाचे २८ हजार कोटी जमा

    दिनांक :06-May-2019
100 टक्के उद्दिष्ट पूर्ण
 
 
 पुणे: दरवर्षी स्वत:च्याच वसुलीचे विक्रम मोडणार्‍या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने यंदाही भरघोस उत्पन्नाचा आपलाच विक्रम मोडला आहे. 2018-19 आर्थिक वर्षात नोंदणी व मुद्रांक विभागाने महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण केले असून,
22 लाख 91 हजार 922 दस्त नोंदणीतून सुमारे 28 हजार 404 कोटींचा महसूल जमा झाला आहे.
 

 
 
जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती वा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार, शेअरबाजार अशा विविध होणार्‍या करांच्या नोंदणीतून नोंदणी विभागाकडे कर जमा होतो. रेडी रेकनरच्या माध्यमातून शासन दरवर्षी स्थावर मालमत्तेचे दर जाहीर करत असते. ती िंकमत कर आकारणीची किमान आधारभूत रक्कम मानली जाते. मुद्रांक शुल्कापोटी जमा कर हा शासनाकडे जमा होत असतो. नोंदणी व मुद्रांक विभागाला शासनाने 2018-19 या आर्थिक वर्षात सुमारे 27 हजार कोटींचे उद्दिष्ट दिले होते. मात्र नोंदणी विभागाकडे 28 हजार 404 कोटींचा महसूल जमा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत तब्बल 1 हजार 910 कोटींचा अधिक महसूल जमा झाला आहे. दरम्यान, राज्याला महसूल मिळवून देणारा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग हा दुसर्‍या क्रमांकाचा विभाग आहे. राज्यातील शहरांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. शहरांच्या हद्दीलगतच्या गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत असल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे नोंदणी विभागात मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाला.