दानवेंबद्दलचा खैरेंचा आरोप खरा ठरला तर लोक बिथरतील : संजय राऊत
   दिनांक :06-May-2019
औरंगाबादमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा धर्म पाळला नाही, असा आरोप काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. यावर बोलताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की, खासदार चंद्रकांत खैरेंचा संताप आणि वेदना समजून घेतली पाहिजे. त्यांनी केलेला दानवेंबद्दलचा आरोप खरा ठरला, तर लोक बिथरतील. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
 
 
जालन्यासाठी आम्ही खोतकरांची समजूत काढली. औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरै जे दानवेंबद्दल सांगत आहेत, ते जर खरे ठरले, तर लोक बिथरतील. खैरेंचा संताप आणि वेदना समजून घेतली पाहिजे, खैरे कधीही खोटे बोलत नाहीत. कागदोपत्री दानवेंचे जावई हे आमचेच आमदार आहेत, असे त्यांनी सांगितले. बुरखाबंदीवरील अग्रलेलाखामुळे शिवसेनेत मतभेत झाले आहेत का, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, माझ्या अग्रलेखाची वेळ चुकली; पण आमच्यात काहीही मतभेद नाही. तुम्ही काहीही मनात आणू नका, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे एकच आहेत असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा धर्म पाळला नाही. निवडणुकीत त्यांनी आपल्याला मदत केली नाही, असा आरोपही खैरेंनी केला होता. याची तक्रार भाजपाचे पक्षश्रेष्ठी आणि उद्धव ठाकरेंना करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.