गुजरात ATSच्या महिला अधिकाऱ्यांची धडाकेबाज कामगिरी
   दिनांक :06-May-2019
अहमदाबाद,
 
गुजरात एटीएसच्या चार महिला पोलिस अधिकाऱ्यांनी रविवारी धडाकेबाज कामगिरी केली आहे. या चार महिला अधिकाऱ्यांनी बोटादच्या घनदाट जंगलात घुसून १५ हत्यांचा आरोप असलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुजरात एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार बोटादच्या जंगलात अवैधरित्या बेकायदेशीर हालचाली होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुजरात एटीएसचे डीआयजी हिमांशु शुक्ला यांनी एक टीम तयार केली. त्यामध्ये 4 महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. या टीमने शनिवारी रात्री बोटाद जंगलामध्ये सर्च ऑपरेशन सुरु केले. त्यानंतर या महिला अधिकाऱ्यांनी चोख कामगिरी बजावत कुप्रसिद्ध डॉन जुसब अलारखा सांध याला अटक केली.
 
 
 
जसुबला पकडण्यासाठी या अधिकाऱ्यांनी जंगलात मध्यरात्री पायी चालत जाऊन या गुन्हेगाराला घेरले. गुन्हा केल्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी सांध जंगलात लपत असे. जसुबवर अनेक हत्यांचा आरोप आहे. जुनागढ पोलीस ठाण्यात जसुब अलारखाविरोधात 15 हत्या आणि खंडणीचे आरोप आहेत. जसुब अल्लाराखाला पकडणं पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. त्यामुळे या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या या महिला पोलिसांच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.