भरती प्रक्रियेत वशिलेबाजी नसणार; एसटीची ग्वाही

    दिनांक :06-May-2019
 
 
मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सुरू असलेल्या चालक आणि वाहकपदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांनी कुणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

 
 
मागील चार वर्षांमध्ये महामंडळाकडून अतिशय पारदर्शक पद्धतीने विविध पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. स्वतः महामंडळाचे अध्यक्ष प्रत्येक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कोणत्याही पदासाठी कुणाचाही वशिला चालणार नाही. तसेच, प्रलोभने, लाच, हस्तक्षेप असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
सदर भरती प्रक्रियेत नियमांनुसार कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रतेची चाचणी पूर्ण करण्यात येत आहे. कोणत्याही वशिला वा अवैध हस्तक्षेपाने उमेदवाराला भरती केले जाणार नाही. तसेच, 17 ते 19 मे रोजी विविध वर्ग 1 आणि 2 च्या अधिकारी पदासाठी होणार्‍या लेखी परीक्षेबाबत देखील उमेदवारांनी वशिलेबाजी, आमिष, प्रलोभनासमोर झुकू नये. उमेदवारांना भरती प्रक्रियेबद्दल काही शंका वा तक्रार असल्यास आपल्याकडील सबळ पुराव्याच्या आधारे 1800-1218414 या निःशुल्क दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंद करावी, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, 24 फेब्रुवारी 2019 रोजी राज्याच्या 21 जिल्ह्यांमध्ये सुमारे आठ हजार 22 चालक आणि वाहकपदांसाठी लेखी परीक्षा पार पडली. यातील उत्तीर्ण उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक क्षमता चाचणी प्रक्रिया सुरू आहे.