रालोआला बहुमत मात्र भाजपाला कठीण: संजय राऊत
   दिनांक :07-May-2019
मुंबई, 
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी यंदाच्या लोकसभा निवडुकीत भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र भाजपा मित्रपक्षांच्या मदतीने पुन्हा केंद्रात सत्तेत येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 
 
२०१४च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी २८० जागांपर्यंत मजल मारणे, भाजपासाठी थोडे कठीण आहे. राम माधव जे म्हणालेत ते खरे आहे. केंद्रात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार आहे, पण भाजपाला स्वबळावर या निवडणुकीत २८०-२८२ जागांपर्यंत मजल मारता येणार नाही. तो आकडा भाजपा व मित्रपक्ष मिळून सहज पूर्ण करतील. एनडीएला निश्चितपणे बहुमत मिळेल', असे राऊत यांनी यावेळी नमूद केले.
राऊत पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास शिवसेनेला निश्चितच आनंद होईल. दरम्यान, राम माधव यांनी एका मुलाखतीत, भाजपला केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांचा पाठिंबा लागेल, असे म्हटले होते. एनडीए सहज बहुमत मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.