पाणी मिळत नसल्याने पक्ष्यांच्या मृत्यूत वाढ
   दिनांक :07-May-2019
- सुर्य आग ओकतोय
- पशु-पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करणे काळाची गरज
- ग्रामस्थांसह प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती 
 
 
उंबर्डा बाजार,
दिवसेंदिवस सुर्य आग ओकू लागला असून, तीव्र उन्हामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहे. ग्रामीण भागाचे तापमान सुध्दा 42 ते 44 अंश सेल्सिअस या दरम्यान राहत असल्याने अंगाची काहीली होत आहे. पाणी टंचाई मुळे ग्रामस्थांची भटकंती होत आहे. तसेच मुक्या जनावरांना पाणी मिळत नसल्याने पाण्यावाचून त्यांचेही हाल होत आहे. अशातच वन्य पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही निर्माण झाला असून, पाण्याअभावी पक्ष्यांच्या तडफडून मृत्यू होत असल्याच्या घटनाही परिसरात पहावयास मिळत आहेत. त्यामुळे पक्ष्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटविण्यासाठी त्यांच्यासाठी चंचुपात्र उपलब्ध करून त्यात पाणी ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
 
उन्हाळा दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करीत असला तरी पशुपक्ष्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. अन्यथा येणार्‍या पिढीत मुलांना शिकविण्यासाठी पशुपक्ष्यांचे चित्रच पहायला मिळेल . ग्रामीण भागामध्ये वन्यप्राणी व पशुपक्षी हे जैवविविधतेसाठी गरजेचे आहेत. त्यांनाही मानवा प्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या दाणापाण्याची व्यवस्था करून त्यांना जगविणे ही मानवतेची गरज आहे. पशुपक्ष्यांच्या अनेक दुर्लभ जाती आपल्या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. मोबाईलचा वापर व त्यांच्या लहरी मुळे पशुपक्ष्यांची संख्या कमी होत आहे. वाढत्या शिकारीमुळे कावळे, चिमण्या, पोपट, बदक, घार, लांडोर, कोकीळा आदी पक्षी दिसेनासे झाले आहेत. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने झाडावर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करून त्यांना जिवनदान द्यावे अन्यथा येणार्‍या काळात पक्षी केवळ चित्रातच दिसतील अशी भीती निसर्ग प्रेमी व पक्षी प्रेमी व्यक्त करीत आहे.