खिद्रापूर मंदिर; एक अद्भुत पाषाणशिल्प!

    दिनांक :07-May-2019
शिल्पा मिराशी
 
‘कट्याळ काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘भोला भंडारी’ हे गाणे एका अप्रतिम पाषाणपुष्पात चित्रित केले आहे. ते पाहिल्यापासूनच ती मूर्तिकला व मंदिरस्थापत्य पाहावे, अशी मनापासून इच्छा होती. ते मंदिर कोल्हापूरजवळील खिद्रापूर या गावी आहे, ही माहिती वाचतानाच मला आठवले- माझे आजोबा, महामहोपाध्याय पद्भूषण कै. वा. वि. मिराशी यांनी सुमारे 60-70 वर्षांपूवी खिद्रापूरच्या शिवमंदिरावर संशोधन केले आहे व त्याचे वर्णन त्यांनी ‘शिलाहार राजवंशाचा इतिहास व कोरीव लेख- 1974’ या पुस्तकात केले आहे. 
 
 
वडाच्या झाडांच्या सान्निध्यात डौलाने उभे असलेले हे पाषाणशिल्प अतिशय देखणे दिसत होते. कोल्हापूरपासून 40 किमी. अंतरावर शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावर स्थित महादेवाचे हे मंदिर फारसे प्रसिद्ध नसल्याने आपले वेगळेपण व सुबकता टिकवून आहे. खिद्रापूर गावास तीन बाजूस कृष्णा नदीचा वेढा आहे आणि पूर्ववाहिनी कृष्णा खिद्रापूरला वळसा घालून पश्चिम वाहिनी झाली आहे. खिद्रापुरास फार पूर्वी ‘कोप्पम’ िंकवा ‘कोप्पद’ असे म्हटले जात होते. एकूण 12 शिलालेख मंदिरपरिसरात आढळतात व एक ताम्रपटदेखील आहे. शिलालेखावरील भाषा व लिपी कानडी आहे.
 
सुमारे 104 फूट लांब, 65 फूट रुंद व कळसापर्यंत 52 फूट उंच असलेले कोपेश्वराचे हे देवालय पूर्वाभिमुख आहे. गर्भगृह, अंतराळ, गूढमंडप व सभामंडप असे त्याचे 4 भाग आहेत. या मंदिराची वैशिष्ट्ये म्हणजे स्वर्गमंडप, गाभारा व सूक्ष्म शिल्पकला होय. शिल्पवैभवाने नटलेल्या या मंदिराच्या बाहेरील बाजूस गजपट्ट व नरपट्ट असून रेखीव बारकावे, जसे आभूषणे व अलंकार आढळतात. 
 
 
मंदिराचा पहिला टप्पा-गोलाकार स्वर्गमंडप! 48 खांबांवर उभारलेला हा स्थापत्याचा उत्तम नमुना! 13 फूट व्यासाच्या रंगशिलेवर उभे राहून नभमंडपाचे सुंदर दर्शन घडते. यानंतरचे सभामंडप चौकोनी असून 60 खांब भौमितिक रांगेत आहेत व छतापर्यंत नक्षीकामाने मढलेले आहेत. यानंतरचे अंतराळ हे गर्भगृहापर्यंत आपल्याला नेते. प्रवेशद्वाराशी 8 फूट उंचीचे द्वारपाल आढळतात.
 
येथील मंडपात नंदी नाही. याची पौराणिक पार्श्वभूमी अशी- दक्षराजाच्या 16 कन्यांपैकी सर्वात लहान कन्या सती. हिने सर्वांच्या विरोधाला न जुमानता भगवान शंकराशी विवाह केला. दक्षराजाच्या वाजपेय यज्ञात त्याने शंकराला व सतीला आमंत्रण दिले नाही, पण सतीने माहेरी जाण्याचा आग्रह धरला. शंकराने तिला नंदीसोबत पाठविले म्हणून येथे नंदी नाही. माहेरी सतीचा अपमान झाला. तिने यज्ञकुंडात आत्माहुती दिली. शंकराने वीरभद्राला आवाहन करून त्याच्याकडून यज्ञाचा विध्वंस केला. शंकराने क्रोधाने आपल्या जटा भूमीवर आपटून क्रोध प्रकट केला तो हा कोपेश्वर! येथील गाभार्‍यात दोन िंलगांची स्थापना आहे. पूर्वाभिमुख मंदिरातील गाभार्‍यात मधोमध शिविंलग व त्याच्या पूर्वेला लागूनच विष्णुरूपातील शाळुंखा. एक कोपेश्वर तर दुसरा धोपेश्वर!
 
गर्भगृह, अंतराळ आणि गूढमंडप ही बाहेरील बाजूने तारकाकार असल्याने त्यावर कोरलेल्या मूर्तींना छायाप्रकाशाच्या समुचित योजनेने सुंदर उठाव मिळतो. या वरच्या भागावर अनेक देवदेवता, सूरसुंदरी नृत्याच्या विविध मुद्रांमध्ये आढळतात. याशिवाय महिषासुरमर्दिनी, भैरव, विष्णू, ब्रह्मदेव, विविध दिक्‌पाल इ.चे मोठे शिल्पपट्ट सर्वच बाजूस बसविले आहेत. प्रचंड शिस्तबद्धता व प्रमाणबद्धता राखून या मंदिरात सुंदर शिल्पाकृती उभ्या आहेत. अतिशय जड व मोठ्ठाले दगड एकमेकांवर रचले आहेत. हे शिलाखंड सांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या पोलादी पट्‌ट्या, दगडांतील खोबण्या, चौकटीवरील छिन्नी, पाणीवहनाची योग्य व्यवस्था इ. पाहून त्या काळातील स्थापत्यकलेची वैज्ञानिक बाजू समजून येते.
 
इ. सन 1214 मध्ये यादवसम्राट सिंघणदेव यांनी कोपेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिरातील अनेक मूर्ती मूर्तिभंजकांनी भग्न केलेल्या आढळतात; तरीही त्या पाहताना पूर्वीचे सौंदर्य कसे होते याची कल्पना येते. त्यांचा भव्यपणा व प्रचंड भौमितिक आकार पाहून त्या काळातील स्थापत्यविशारद व मूर्तिकारांचे ज्ञान किती प्रगत होते. याची प्रचीती येते. दीड हजार वर्षांपूर्वी आपल्या देशातील समाजजीवनाचे व संस्कृतीचे प्रतििंबब कोपेश्वर मंदिराच्या रूपाने पाहायला मिळते. कलाकुसरीने नटलेले व उत्तुंग शिल्पकलेचा नमुना असलेले हे मंदिर एकदा जरूर पाहावे!