मोदींच्या थोबाडीत मारावीशी वाटते : ममता बॅनर्जी
   दिनांक :07-May-2019
- पंतप्रधानांविषयी बोलताना ममतांचा तोल घसरला
 
कोलकाता,
लोकसभेच्या निवडणूक प्रचारात सरकारवर टीका करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अतिशय खालच्या पातळीची टीका केली आहे. निवडणूक येताच मोदी रामनामाचा जप करत असतात. त्यांच्यासारखा खोटारडा पंतप्रधान मी आजवर पाहिला नाही. त्यांच्या थोबाडीत मारावीशी वाटते, असे धक्कादायक विधान ममता बॅनर्जी यांनी केले आहे.  

 
पुरुलिया येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी हे धक्कादायक विधान केले. मोदींनी ५ वर्षात अच्छे दिन आणण्याच्या गोष्टी केल्या होत्या. परंतु, नंतर त्यांनी नोटाबंदी केली. ते संविधान सुद्धा बदलणार आहेत. भाजपाच्या घोषणांवर माझा तिळमात्र विश्वास नाही. पैसा माझ्यासाठी सर्व काही नाही. मात्र मोदी जेव्हा पश्चिम बंगालमध्ये येतात आणि टीएमसी लुटारुंचा पक्ष असल्याचा आरोप करतात तेव्हा त्यांच्या थोबाडीत मारावीशी वाटते, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
 
 
 
पुरुलियातील आदिवासी गावांबद्दल मोदींना काय माहिती आहे? आतापर्यंत या भागात ३०० आयटीआय महाविद्यालये सुरू करण्यात आले आहेत. मी प्रचंड संघर्ष केला. पण स्वत:ला विकून किंवा स्वत:चे मार्केटिंग करून राजकारण केले नाही, असेही त्या म्हणाल्या.