तेजबहादूरच्या व्हिडीओवर सपा-बसपाने माफी मागावी
   दिनांक :07-May-2019
- भाजपाची मागणी
 
 
नवी दिल्ली,
50 कोटी रुपये कोणी देत असेल, तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करायला तयार असल्याच्या तेजबहादूर यादव यांच्या वादग्रस्त व्हिडीओबद्दल मौन बाळगल्याबद्दल भाजपाने आज मंगळवारी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी यांच्या हत्येची धमकी देणार्‍या या व्हिडीओबद्दल सपा आणि बसपाच्या नेत्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपाने केली आहे.
 
भाजपा मु‘यालयात आयोजित पत्रपरिषदेत भाजपा प्रवक्ते डॉ. संबित पात्रा म्हणाले की, तेजबहादूरच्या व्हिडीओबद्दल सर्वजण मौन बाळगून का आहे, एकही विरोधी नेता याबद्दल बोलत का नाही.
 
हे अतिशय गंभीर आणि पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरण आहे, त्यामुळे या मुद्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असे त्यांनी सांगितले. सपा नेते अखिलेश यादव काही दिवसांपूर्वीपर्यंत तेजबहादूर यादव यांची प्रशंसा करीत होते, याकडे लक्ष वेधत ते म्हणाले की, त्यामुळे तेजबहादूर यादवचा हा व्हिडीओ पाहून सपा बसपा आघाडीच्या नेत्यांनी आतापर्यत बाळगलेले मौन सोडत देशाची माफी मागितली पाहिजे.
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झापड मारली जाते, तर त्याचा आवाज महिनाभर ऐकू येतो, मात्र याठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचे कारस्थान उघडकीस येते आणि त्याबद्दल एकही विरोधी पक्षनेता बोलत नाही. नरेंद्र मोदी भाजपाचे पंतप्रधान नाही, तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहे, त्यामुळे सर्वांनीच या प्रकाराचा निषेध करायला हवा, असे ते म्हणाले.
 
तेजबहादूर यादवच्या व्हिडीओतील विधानाशी विरोधी पक्षांचे नेते सहमत आहे का, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी करीत, कामदारांचा निवडणुकीत पराभव करू शकत नसल्यामुळे विरोधी पक्षांचे नेते या पातळीपर्यंत खाली उतरले का, असा सवाल त्यांनी केला.
 
सीमा सुरक्षा दलातील जवानांना मिळणार्‍या खराब भोजनाच्या तक्रारीमुळे तेजबहादूर यादव चर्चेत आला होता, याच कारणामुळे त्याला बडतर्फही करण्यात आले होते. त्याने वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला होता. यादवच्या उमेदवारीला समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला होता. मात्र, निवडणूक अधिकार्‍यांनंी यादवचा अर्ज फेटाळून लावला. याला यादवने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याच यादवचा हा वादग‘स्त व्हिडीओ आहे. ज्यात तो कोणी आपल्याला 50 कोटी रुपये देत असेल तर आपण पंतप्रधान मोदी यांची हत्या करायला तयार असल्याचे सांगत आहे.