सामानाच्या गाडीत परतीचा प्रवास
   दिनांक :07-May-2019
घुमू संगतीनं 
अमान रेड्डी 
 
सकाळी नाष्टा केला, विशालकडे बाईकची चावी दिली. सगळ्या संघाचे एकत्र फोटो सेशन झाले. मग मी दुरुस्ती गाडीत जाऊन बसलो. गंमत अशी आहे की मी लडाखला जायचं ठरवत होतो, तेव्हा मला फक्त मनाली ते श्रीनगर एवढंच अंतर बाईक चालवायची हौस होती. मला जम्मू ते श्रीनगर किंवा चंडीगढ ते मनाली अजिबात इच्छा नव्हती. ते खूपच कंटाळवाणे असणार, असे वाटत होते. नशीब बघा! मी नेमके मनाली ते चंडीगढ अंतर गाडीत बसून जाणार होतो; पण माझी बाईक मात्र चालवली जाणार होती... 
 
 
निघालो व बाईकर्स आणि आमचा संबंध तुटला. कोणीच दिसेना. डावीकडे व्यास नदी धावत होती. तिचा तोच 20 वर्षांपूर्वी ऐकलेला धीरगंभीर आवाज ऐकून कान तृप्त झाले. 20 वर्षांपूर्वी हा आवाज उत्तररात्रीच्या अंधारात ऐकला होता. भयंकर घाबरायला झाले होते. आत्ता मात्र दिवसा बघत असल्याने खूप मस्त वाटले ते खळाळते पाणी पाहून. कुलुला लगेच चालकाच्या नाष्ट्यासाठी गाडी थांबली. कहर म्हणजे तासाभरापूर्वीच आमचा नाष्टा झाला असूनही आमची प्रवासी वाहनातील मंडळीदेखील नाष्टा हाणत होती. पुन्हा प्रवास सुरू झाला अन्‌ मग अचानक मला माझी बाईक दिसली. विशाल चालवित होता ती. मी फोटो काढून घेतला.
- advt - 
 
पलिकडे एक रस्ता डावीकडे गेला जो मी घेतला असता जर स्पितीला गेलो असतो; पण आज आम्ही उजवीकडे वळलो. मग वेगवेगळी गावे लागत गेली. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे व खूपच गावं असलेला आहे. कधी 10-15 किलोमीटरपण नव्हते निर्मनुष्य असे. फारच रुक्ष ! आता कुलु नंतर चांगलेच उकडायला लागले होते. मी आपला डुलक्या काढत उकाड्याकडे दुर्लक्ष करत होतो. आमचा चालक भयानक चालवत होता, अगदी सगळे हिमाचली चालक चालवतात तसा. फास्ट और फ्युरिअस ! मधेच कुठेतरी त्याने चहासाठी म्हणून गाडी थांबवली; पण 5 मिनिटातच निघालो. त्याने चहा प्यायलाच नाही. थांबलो होतो तिथे नदी होतीच आणि दोन्ही बाजूला ऊंच पर्वत होते. दोन्हीकडे काही ऊंचीवर तुरळक वस्ती होती आणि त्या दोन डोंगरांमधे, त्या दोन वस्त्यांमधे ऊंचावर एक जाडजूड तार बांधली होती. ती चक्क केबल कार होती. सामानाची वहातुक करायला.
 
खाली नदीवर एक छोटा पूल होता झुलता पूल म्हणतात तसा. मस्त दृष्य होते. फोटो काही नीट काढता आला नाही. आम्ही कोणीच चहा न पिता निघालो. पुढे परत 10 मिनिटांनी चालक थांबला व एका चहावालीच्या बाजूला जाऊन बसला. 2 मिनिटातच परत आला. एव्हाना मला त्यांच्या बोलण्यावरून शंका आलीच होती, की ते काहीतरी नशेचा माल शोधत आहेत. तो त्यांना त्या चहावालीकडे मिळाला व मग त्याची बिडी वळून ते पीत बसले. ती पिऊन झाल्यावर बहुधा चालकाचा उत्साह संपला असावा गाडी हाकण्याचा. कारण तो लगेच एका ठिकाणी थांबला व तिथे दुकानात गल्ल्यावर बसलेल्या मणसाशी बोलला. आता तो गायब झाला व दुकानदार चालक झाला. आधीच्या चालकाच्या जिथे तिथे ओळखी होत्या व दर 10 मिनिटाला तो कोणाला ना कोणालातरी हाळी देत असे. या चालकाचे मात्र तसे नव्हते. ते बरेच झाले म्हणा हा चालक आरामात चालवत होता. इथे रस्त्यावर 2-3 वेळा गन घेऊन बसलेले वाहतूक हवालदार दिसले व ते चक्क लोकांना पकडत होते, पावती फाडत होते जोरात चालवल्याबद्दल. मला वाटत आमच्या प्रवासी वाहनाला पण थांबवल गेले होते.
 
अचानक एका बाईकरचा फोन आला. तो म्हणाला, मी इथे इथे आहे व मला गाडीत बसायचे आहे. मग पुढे 10 किलोमीटरवर तो होता त्या हॉटेलपाशी थांबलो. वेफर्स, आइस्क्रीम खाले. त्याला गाडीत जागा केली व निघालो. मग वाटेत मस्त काहीबाही स्थानिक फळे खात राहिलो. एका ठिकाणी पेट्रोल भरले व तिथून निघालो तर लगेचच्याच हॉटेलसमोर माझी गाडी दिसली; पण आम्ही जोरात होतो म्हणून थांबलो नाही. नंतर कळले की, थांबलो असतो तर बरे झाले असते. नंतर खूप उशीरा जेवायला थांबलो. तिथून पुढे एक स्वारघाट नावाचा घाट लागला. त्या घाटाच्या अगदी वर बरीच वस्ती होती, शासकीय कार्यालये होती. ही काय उन्हाळ्यात येऊन रहायची ब्रिटीशांची जागा होती की काय कोणास ठाऊक. होती मात्र खूप छान जागा. महाबळेश्वरला आल्यासारखे वाटत होते. स्वारघाट उतरता उतरता परत माझी गाडी दिसली. विशालला काही अडचण होती, पेट्रोलच्या संदर्भात. ती दूर केली. निघालो पुन्हा.
 
आता खरे तर कधी एकदा हॉटेलवर जाऊन पोहोचतो, असे झाले होते. घामाने सकाळपासून चिकचिकाट झाला होता; पण आता आपण चालकाच्या हाती. त्याच हॉटेलमधे आमचे प्रवासी लोकपण होते. म्हणजे गाडीवाल्यांचा हा नेहमीचा थांबा होता. प्रवासी गाडी असल्याने जरा गप्पा मारता आल्या. पहिल्यांदाच प्रवासी लोकांबरोबर बसलो होतो असा. नाहीतर बाईकवर असताना गेल्या 12-13 दिवसात त्यांच्या बरोबर असे कुठे थांबलो नव्हतो वाटेत. तिथे अर्धा तास गेल्यावर निघालो. दरम्यान अतुलचा फोन आला होता की तो हॉटेलवर पोचला आहे; पण इथे कोणीच आपले नाहीयेत. म्हटल, ‘‘तू नक्की पांचकुवा, झिरकपूरच्याच हॉटेलमधे आहेस ना?’’ तो म्हणाला, ‘‘हो तिथेच आहे, आपल्या सगळ्यांची नावे पण आहेत इथे आणि खोली पण मिळाली आहे.’’ आम्ही जवळपास 60-70 किलोमीटरवर होतो अजून.
 
आता चंडीगढच्या खूणा दिसू लागल्या; पण प्रवास काही संपता संपेना. अगदी कंटाळा कंटाळा झाला तेव्हा कुठे चंडीगढचा मुख्य बस थांबा दिसला. म्हणजे अजून 20-30 किलोमीटर जायचे होते. थोड्यावेळाने एक मात्र झाले की चंडीगढचे खरे नियोजनबद्ध रस्ते चालू झाले. मग जरा गाडी वेगात गेली. शेवटी पोहोचलो एकदाचे. काल पर्यंत मनालीत काय मस्त थंड होत आणि आज एकदम कुकरमधे बसल्यासारखे! भोजनकक्षपण वातानुकुलीत होता ते बरे होते. एकूण हॉटेल जरा उच्च दर्जाचे होते. निलेश म्हणाला होता की, गाड्या इथेच ठेवायच्या आहेत. वाहतूक करणारे इथून घेऊन जाणारेत; पण बर्‍याच लोकांना ते मान्य नव्हते. आपल्या समोर गाडीची बांधाबांध झाली पाहिजे, असा आग्रह होता...
 
 मित्रानो घुमू संगतीनं च्या पहिला सीझन संपायला आता अवघे 2 आठवडे उरले आहेत. तुम्ही आपल्या मित्रां सोबत कुठे ‘घुमू संगतीनं’ म्हणत भटकायला गेले असाल तर 50 शब्दात तो अनुभव [email protected] या ईमेल वर पाठवू शकता तो अनुभव आम्ही ‘घुमू संगतीनं’च्या पहिल्या सीझनच्या शेवटच्या भागात प्रसारित करू.