बेंगळुरुनजीक अपघातात खामगावचे सात ठार
   दिनांक :07-May-2019
बुलडाणा,
 
सोमवारी दुपारच्या सुमारास बेंगळुरू येथील वेल्लमा शहरानजीक झालेल्या कार अपघातात खामगाव येथील सात जण ठार झाल्याची घटना घडली.
 
खामगाव येथील मूळचे रहिवासी असलेले मिलिंद नारायण देशमुख हे भुसावळ येथे रेल्वे सुरक्षा दलात हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांचा लहान भाऊ राजेश देशमुख हा बेंगळुरू येथील हवसर येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. मुलांसोबत ते आपल्या लहान भावाकडे गेले होते. देशमुख कुटुंबीय सोमवारी दुपारी १ वाजता कार घेऊन फिरायला जात होते. दरम्यान त्यांच्या कारला वेल्लूर जिल्हयातील अंबूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या वेलम्मा जवळ अपघात झाला. यामध्ये मिलिंद नारायण देशमुख (४५), त्यांची पत्नी किरण मिलिंद देशमुख (३५), मुलगा आदित्य (१२) व अजिंक्य (०७) यांच्यासह राजेश नारायण देशमुख (३७), पत्नी सारिका राजेश देशमुख (३१) अशा सहा जणांसह चालक जागीच ठार झाले. या घटनेची माहिती खामगाव येथे मिळताच देशमुख कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.