खड्ड्यात गेलेला ट्रक भिंतीवर कोसळला
   दिनांक :07-May-2019
मोठी दुर्घटना टळली
गणेश विहारची घटना
 
 
अमरावती: साईनगर प्रभागातील गणेश विहार परिसरात पाण्याची पाईप लाईन दुरुस्तीसाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात मंगळवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास रेती घेऊन आलेल्या ट्रकचे मागील चाक फसल्याने हा ट्रक चक्क बाजूच्याच घराच्या भिंतीवर जाऊन पडला. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली. थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे परिसरातले नागरीक संतप्त झाले आहे.
 

 
 
नगरसेविका मंजुषा जाधव यांच्या प्रयत्नाने चार महिन्यापूर्वी गणेश विहारच्या पाण्याच्या टाकी जवळून पुढे सिमेंट रस्त्याचे बांधकाम काम करण्यात आले. दीड वर्षापूर्वी क्रांती कॉलनी येथील पाण्याच्या टाकीसाठी मोठी पाईपलाईन याच रस्त्याखालून टाकण्यात आली होती. पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने आत्तापर्यंत दोन वेळा पाईप लाईन लिकेज झाली आणि त्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला आहे. चार महिन्यापूर्वी बांधलेल्या रस्त्यावर दोन महिन्यापूर्वी लिकेज सुधरविण्यासाठी रिचारिया यांच्या घरासमोर गड्डा करण्यात आला. दीड-दोन महिने काम चालले. परंतु, त्यानंतर करावयाची दुरुस्ती योग्य पध्दतीने न केल्यामुळे तेथे गड्डा तसाच राहिला. त्याच गड्ड्यात सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान दहा चाकांचा रेतीचा ट्रक अडकला आणि या ट्रकचा तोल गेल्यामुळे तो लगतच्या घराच्या सुरक्षा भिंतीवर जाऊन कोसळला. त्यामुळे मोठा अपघात घडला. एका घराचे फाटक आणि माजी पोलिस अधिकारी पी.टी. पाटील यांच्या घराची भिंत कोसळली. सुदैवाने तेव्हा येथे कोणीच नव्हते. सद्या सुट्टी असल्याने या ठिकाणी कॉलनीतील लहान मुले खेळत असतात. पण, अपघात घडला त्यावेळी कोणीही बाहेर नव्हते. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. 
पाईप लाईन निकृष्ट
या भागात जी पाईप लाईन टाकण्यात आली आहे, ती अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगण्यात येत आहे. फारच कमी दिवसात ती दोनवेळा लिकेज झाल्याने त्यावर शिकमोर्तब झाले आहे. या पाईप लाईनकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी लक्ष देतील काय? असा प्रश्न नागरिकांना पडला असून नव्याने तयार झालेला सिमेंट रोड पुन्हा दुरुस्त होईल की नुसती थातुरमातुर डागडुजी केली जाईल, याकडे सुद्धा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.