लैंगिक छळ प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात कलम १४४ लागू
   दिनांक :07-May-2019
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधातील लैंगिक छळाचे प्रकरण हाताळण्यासाठी अवलंबण्यात आलेल्या पद्धतीविरोधात वकिल आणि महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
 
 
एका माजी कर्मचारी महिलेने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपात सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निर्दोष असल्याचा आणि हे आरोप निराधार असल्याचा निर्वाळा याप्रकरणी नेमलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीने दिला आहे.
आज सकाळपासून या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालय परिसरात आंदोलन सुरु आहे. पोलीस गर्दीला पांगवताना परिस्थिती हाताबाहेर गेली. पोलिसांनी पत्रकारांनाही ताब्यात घेतले होते. या घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना नंतर सोडून दिले. दिल्लीच्या मंदिर मार्ग पोलिसांनी ३० महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सुप्रीम कोर्टाच्या परिसरात सुरक्षा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
 
 
न्यायमुर्ती एसए बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीने हे प्रकरण हाताळण्यासाठी जी पद्धत अवलंबली त्याविरोधात अनेक कार्यकर्ते आणि वकिल आंदोलन करत आहेत. रंजन गोगोई यांना क्लीनचीट देणाऱ्या त्रिसदस्यीय समितीने जी पद्धत अवलंबली त्याविरोधात हे आंदोलन आहे असे नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियाच्या सरचिटणीस अन्नी राजा यांनी सांगितले.