अवैध सावकाराने माय-लेकाला जाळले!

    दिनांक :07-May-2019
जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू
व्याजाच्या पैशासाठी गुंडागर्दी
चंद्रपूर: व्याजाने घेतलेल्या पैशासाठी वारंवार वाद उकरून काढणार्‍या महानगरातील एका अवैध सावकाराने चक्क माय-लेकावर पेट्रोल टाकून त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात आईला वाचविण्यासाठी गेलेला मुलगाही 40 टक्के भाजला. तर आई 60 टक्के भाजली. त्यांच्यावर येथील कोलसिटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवार, 7 मे रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास मूल मार्गावरील सरकार नगर येथे घडली. आरोपी जसबीरसिंह भाटिया यांच्याविरुध्द 307, 324 व 435 भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

 
 
कल्पना रघुनाथ हरणखेडे व पियुष रघुनाथ हरणखेडे असे जखमींचे नाव आहे. सरकार नगर येथील हरणखेडे परिवाराने आरोपी जसबीरसिंह भाटिया कडून दोन लाख रूपये व्याजाने कर्ज घेतले होते. व्याजाने घेतलेल्या कर्जातील काही रक्कम मिळाली नसल्याने सोमवारी भाटियाने हरणखेडे यांचे घर गाठले. त्यावेळी मंगळवारी पैसे देतो, असे त्यांना हरणखेडे परिवाराने सांगितले होते. भाटिया मंगळवारीसुध्दा त्यांचा घरी गेला. परंतु, तोपर्यंत हरणखेडे यांच्याकडे ज्यांच्याकडून पैसे येणार होते, त्यांच्याकडून ते आलेले नसल्याने, उद्या पैसे देतो असे सांगण्यात आले.
 
पण, मला आताच पैसे पाहिजे, अन्यथा घर जाळून टाकीन, असा दम या अवैध सावकाराने दिला. काही वेळात तो पेट्रोलच्या दोन शिश्या घेऊ आला आणि क्षणात त्याने पेट्रोल हरणखेडे यांच्या घरावर आणि परिवारावर शिंपळण्यास सुरवात केली आणि लगेच आग लावली. यात पियूष व कल्पना हरणखेडे गंभीररित्या भाजल्या गेले. शिवाय घरातील काही साहित्य जळून खाक झाले. हरणखेडे यांच्या घरातून धूर व आरडाओरड होत असल्याने शेजारील नागरिकांनी हरणखेडे यांचे घर गाठले. आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. यात त्या आरोपी सावकाराचाही हातही भाजला होेता.
 
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जखमींना सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने जखमींना कोलसिटी रूग्णालयात हलविले. या रूग्णालयात सावकार व हरणखेडे माय-लेकावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळाला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी सरदार पाटील, ठाणेदार प्रकाश हाके यांनी भेट देवून पाहणी केली.