डेव्हिड वॉर्नरने 'ओपनर'चे स्थान गमावले

    दिनांक :07-May-2019
ब्रिसबन ,
 चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात एका वर्षांच्या बंदीची शिक्षा पूर्ण करून स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन केले. वॉर्नर व स्मिथ यांच्या समावेशाने ऑस्ट्रेलियाचा संघ संतुलित वाटत असला तरी सलामीच्या जागेवरून संघात दोन प्रवाह निर्माण होण्याची शक्यता आहे. सलामीसाठी वॉर्नरचं नाणं खणखणीत असलं तरी त्यानं हे स्थान गमावल्याचे पाहायला मिळाले.
 

 
वर्ल्ड कप तयारीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाच्या संघाने सोमवारी न्यूझीलंड एकादश संघाविरुद्ध सराव सामना खेळला. या सामन्यातून स्मिथ व वॉर्नरने राष्ट्रीय संघात कमबॅक केले. स्मिथने पहिल्याच सामन्यात उत्तम क्षेत्ररक्षण करत आपली छाप पाडली. 
प्रत्युत्तरात अ‍ॅरोन फिंच याच्यासोबत सलामीला कोण येईल याची उत्सुकता लागली होती. पण, संघाने वॉर्नरच्या जागी उस्मान ख्वाजा सलामीला आला आणि सर्वांच्या भूवया उंचावल्या. पण, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या वॉर्नरने 43 चेंडूंत 39 धावांची खेळी करतान सर्वांची वाहवाह मिळवली. त्याच्या या खेळीत 6 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाने 1 विकेट राखून हा सामना जिंकला. फिंचने 52 धावांची खेळी केली.