मतदान सुरु असताना हॉटेलमध्ये आढळल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स
   दिनांक :07-May-2019
सोमवारी बिहारमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरु असताना मुझफ्फरपूर येथील एका हॉटेलमध्ये दोन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे हे हॉटेल मतदान केंद्रापासून अगदी जवळच्या अंतरावर होतं. हॉटेलमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स सापडल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर मॅजिस्ट्रेट अवदेश कुमार यांच्याकडे मुझफ्फरपूर येथील चार ईव्हीएम मशीन्सची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परिसरातील एखादं ईव्हीएम मशीन खराब झाल्यास बॅक अप म्हणून या मशीन्स ठेवण्यात आल्या होत्या.
 

 
मुझफ्फरपूर येथून मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर ड्रायव्हरने आपल्याला मतदान करायचं असल्याने थोडा वेळ मागितला. यावेळी अवदेश कुमार हॉटेलमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिटसोबत उतरले होते. काही वेळात निवडणूक अधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन हॉटेलमध्ये थांबले असल्याची बातमी परिसरात पसरली. कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित करत आंदोलन करण्यास सुरुवात केली.
यानंतर काही वेळातच उप-विभागीय अधिकारी कुंदन कुमार हॉटेलमध्ये पोहोचले आणि ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन्स जप्त केल्या. ‘सेक्टर ऑफिसरला काही आरक्षित अतिरिक्त मशीन्स देण्यात आल्या होत्या. जेणेकरुन एखादी मशीन खराब झाल्यास ती बदली करता येईल. ईव्हीएमची बदली केल्यानंतर त्यांच्याकडे दोन ईव्हीएम, १ कंट्रोल युनिट आणि दोन व्हीव्हीपॅट त्यांच्या राहिल्या होत्या’, अशी माहिती मुझफ्फरपूरचे जिल्हा दंडाधिकारी आलोक रंजन यांनी दिली आहे.
 
 
 
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘त्यांनी या मशीन्स हॉटेलमध्ये घेऊन जाण्यास नको होतं. हे नियमांच्या विरोधात आहे. नियमांचं उल्लंघन केलं असल्याने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी केली जाणार आहे’. दरम्यान अवदेश कुमार यांना मशीन्स हॉटेलमध्ये घेऊन गेल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.