गिरिराजसिंह न्यायालयास शरण, जामीन मंजूर
   दिनांक :07-May-2019
 बेगुसराय: निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह हे आज मंगळवारी स्थानिक न्यायालयास शरण आले. बिहारमधील एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी मुस्लिम समुदायाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याबाबत त्यांना आयोगाने नोटिस बजावली होती. जनप्रतिनिधी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. गिरिराजसिंह हे आज मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात शरण आले. न्यायालयाने त्यांना पाच हजार रुपयांच्या व्यक्तीगत हमीनंतर जामीन मंजूर केला.
 
 
 
जे ‘वंदे मातरम्‌’ म्हणू शकत नाहीत वा मातृभूमीचा सन्मान करू शकत नाहीत, त्यांना राष्ट्र कधीही क्षमा करणार नाही. माझ्या पूर्वजांनी सिमरिया घाट येथे देह ठेवला. त्यांना कबरीची गरज भासली नाही. तुम्हाला मात्र, तीन हात जमिनीची गरज असते, असे वक्तव्य त्यांनी 24 एप्रिल रोजी बेगुसराय येथील प्रचारसभेत केले होते. या सभेला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, तसेच भाजपाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. गिरिराजसिंह यांच्या वक्तव्याची दखल घेत, निवडणूक आयोगाने त्यांना नोटिस बजावली होती.
बेगुसराय येथे 29 एप्रिलला मतदान झाले. भाजपातर्फे गिरिराजसिंह, भाकपतर्फे कन्हैयाकुमार आणि राजदतर्फे तनवीर हसन, अशी येथे लढत झाली. आता, निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.