आयसीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर
   दिनांक :07-May-2019
मुंबई, 
 
सीबीएसईपाठोपाठ आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. यातही मुलींनी बाजी मारली असून आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत 98.54 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर बारावीचा निकाल 96.52 टक्के इतका लागला आहे. आज दुपारी तीन वाजता आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे निकाल जाहीर झाले.
 
 
यंदा आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या निकालाच्या टक्केवारीत किंचित सुधारणा झाली आहे. दहावीच्या निकालाच्या टक्क्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.03 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर बारावीच्या निकालात 0.31 टक्क्यांची वाढ झाली आहे. आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत मुंबईच्या जमनाबाई नर्सी शाळेची जुही कजारिया 99.60 टक्क्यांसह देशात पहिली आली आहे. तर मुंबईचे फोरम संजनवाला आणि अनुश्री चौधरी, अनुष्का अग्निहोत्री आणि ठाण्याचा यश भन्साळी देशात संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 99.40% मिळाले आहेत.