भारत तिसर्‍या क्रमांकाची जागतिक अर्थसत्ता होणार : राजनाथसिंह
   दिनांक :07-May-2019
गोड्डा मतदारसंघात झंझावाती प्रचार
 
  
 
गोड्डा: येत्या पाच वर्षांत भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थसत्ता होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज मंगळवारी गोड्डा लोकसभा मतदारसंघातील पठारगमा येथे आयोजित प्रचारसभेत व्यक्त केला.
 
गोड्डा मतदारसंघात राजनाथसिंह यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. आपल्या दौर्‍यात पठारगमा येथील सभेत बोलताना राजनाथसिंह म्हणाले, आमच्या सरकारने विकास कार्यांना गती दिली आहे. लोकांच्या मनात विश्वास जागविला आहे. सरकारची काम करण्याची ही पद्धत आहे. मागील चार वर्षांमध्ये देशभरातील एक कोटी 30 लाख व्यक्तींना सरकारने पक्की घरे बांधून दिलीत. येत्या पाच ते सात वर्षांमध्ये एकही कुटुंब दारिद्रय रेषेखाली राहणार नाही. भाजपा सरकारने दारिद्रय रेषेखालील साडेसात कोटी कुटुंबीयांचे जीवनमान उंचावून त्यांना दारिद्रय रेषेबाहेर काढले आहे.
 
यावेळी त्यांनी भाजपा उमेदवार निशीकांत दुबे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. दुबे यांचा मुकाबला झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) पक्षाचे उमेदवार प्रदीप यादव यांच्यासोबत आहे. येथे 12 मे रोजी मतदान होणार आहे.