IPL 2019;चेन्नईत मुंबई बाजी मारणार?

    दिनांक :07-May-2019
चेन्नई ,
 
गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्स संघाला आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये मंगळवारी आत्मविश्वास उंचावलेल्या मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. चेन्नई संघाला गृहमैदानावर चमकदार कामगिरीचा विश्वास आहे.
साखळी फेरीनंतर आता आयपीएलमध्ये प्ले-आॅफ लढतींना प्रारंभ होत आहे. चेन्नई व मुंबई पहिल्या क्वालिफायरमध्ये आमने-सामने असतील. या लढतीतील विजेता संघ १२ मे रोजी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीसाठी पात्र ठरेल.
 
 
 
उभय संघांनी प्रत्येकी तीनवेळा जेतेपदाचा मान मिळविला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने दमदार सुरुवात केली, पण मधल्या कालावधीत त्यांनी लय गमावली. त्यांना मोहालीमध्ये अखेरच्या साखळी लढतीत पंजाबने ६ गडी राखून पराभूत केले.
 
साखळी फेरीत चेन्नईच्या आघाडीच्या फळीने टप्प्याटप्प्यात चांगली कामगिरी केली. त्यांना मुंबईच्या दिग्गज गोलंदाजांविरुद्ध चांगला खेळ करावा लागेल. मुंबईतर्फे जसप्रीत बुमराह १७, लसिथ मलिंगा १५, हार्दिक पांड्या १४, कृणाल पांड्या व राहुल चहर यांनी प्रत्येकी १० बळी घेतले आहेत. चेन्नई संघाची फलंदाजीची भिस्त कर्णधार धोनीवर अवलंबून आहे.त्याने १२ सामन्यात ३ अर्धशतकांसह ३६८ धावा फटकावल्या आहेत.
 
त्यासोबतच शेन वॉटसन व सुरेश रैना यांना चांगली कामगिरी करावी लागेल. कारण अंबाती रायुडू लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. चेन्नईला केदार जाधवची उणीव भासेल. पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्याच्या स्थानी मुरली विजय किंवा ध्रुव शोरे यांना संधी मिळू शकते. यंदाच्या मोसमात गोलंदाजी चेन्नईची जमेची बाजू ठरली आहे.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकाक, सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, कीरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, मिशेल मैक्लीनागन, मयंक मार्कंडेय, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, अनमोलप्रीत सिंह, सिद्धेश लाड, अंकुल राय, एविन लुईस, पंकज जयस्वाल, बेन कटिंग, ईशान किशन, आदित्य तारे, रसिख सलाम, बरिंदर शरण, जयंत यादव, बूरान हेंडरिक्स, लसिथ मलिंगा.
 
चेन्नई सुपरकिंग्स : महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, रितुराज गायकवाड, ड्वेन ब्रावो, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर, हरभजन सिंग, मिशेल सँटनेर, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, के.एम. आसिफ, दीपक चहर, एन.जगदीशन, स्कॉट के.