मोदींची मानसिक स्थिती ढासळली
   दिनांक :07-May-2019
- छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची वादग्रस्त टीका 
 
 
रायपूर,
राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेनंतर काँग्रेस नेत्यांकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर आगपाखड केली जात आहे. यातच काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी वादग्रस्त टीका करून आता, नवा वाद निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, त्यांना उपचाराची गरज आहे, असे वक्तव्य भूपेश बघेल यांनी केले आहे.
 
मोदी यांचे राजीव गांधी यांच्याबाबतचे विधान असंवेदनशील असून, त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी बघेल यांनी वृत्तसंस्थेसोबत बोलताना आज मंगळवारी केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री बघेल म्हणाले, राष्ट्राच्या निर्माणासाठी राजीव गांधी यांनी मोलाचा वाटा उचलला होता. देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी राजीव गांधी यांनी बलिदान दिले. त्यांच्या मृत्यूनंतर देशाचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ त्यांना देण्यात आला. पंतप्रधानपदावर असणार्‍या मोदींसार‘या व्यक्तीने ‘भारतरत्न’ असलेल्या व्यक्तीचा अपमान करणे हे शोभणारे नाही.
 
मुख्यमंत्री बघेल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातून फक्त तीन-चार तास झोपतात. झोप पूर्ण होत नाही म्हणून त्यांची मानसिक स्थिती खराब झाली आहे. अशा व्यक्तीने देशाच्या सर्वोच्च स्थानावर असणे हे देशासाठी धोकादायक आहे, असेही बघेल म्हणाले. सत्ता काबीज करण्यासाठी मोदी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, असा आरोपही यावेळी त्यांनी केला. नरेंद्र मोदी यांच्या विधानावरुन ते निवडणुकीत पराभूत होणार आहेत हे सिद्ध होत आहे, असेही ते म्हणाले.